ग्रेटा थनबर्गची मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर जाहीर नाराजी


नवी दिल्ली – नीट आणि जेईई परीक्षा कोरोनाच्या संकट काळात पुढे ढकलाव्या अशी मागणी विविध राज्यातून वारंवार करण्यात येत आहे. पण केंद्र सरकार परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहेच, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यानही परीक्षा घेतल्याच पाहिजे, असा निर्णय दिला आहे. याच दरम्यान मोदींच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर स्वीडनची १७ वर्षीय पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्गने टीका केली आहे.

ग्रेटा थनबर्गने याबाबत ट्विट करत कोरोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगणे अन्यायकारक असल्याचे म्हणत आपले मत व्यक्त केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ग्रेटा थनबर्गने म्हटले आहे की, कोरोना संकटात भारतातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसण्याची सक्ती करणे, हे एक प्रकारे अन्यायकारक असून मी जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीचे समर्थन करते.

दरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET UG) वेळेतच होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती एनटीएकडून वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जेईई मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचे एनटीएने सांगितले आहे. जेईई मुख्य परीक्षेसोबत नीट परीक्षाही वेळेतच होणार आहे. १३ सप्टेंबरला ही परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

याच काळात महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहून घेण्यात येणाऱ्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना कोरोना होण्याचा धोका असल्याचे लक्षात घेऊन सर्व परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नीट, जेईई, सीईटीसारख्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि देशातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सध्याचे जूनपासून सुरू झालेले नवे शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ पासून सुरू करावे, अशी मागणी केली आहे.

देशभरात प्रत्यक्ष वा ऑनलाइन परीक्षांसाठी सुरू असलेली प्रक्रिया, विविध व्यावसायिक अभ्यासक्र मांची प्रवेश प्रक्रिया स्थगित करून ती पुढे ढकलावी. त्याचबरोबर जून २०२० पासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटले असले तरी कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये सुरू करता आलेली नाहीत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जात आहे. देशभरातील कोट्यावधी विद्यार्थ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ पासून सुरू करण्याबाबत विचार करावा, अशी विनंतीवजा मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केंद्र सरकारला करोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई आणि ‘नीट’ परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली. धोका कितपत आहे त्याचा आढावा केंद्र सरकारने घ्यावा आणि स्थिती पुन्हा योग्य होईपर्यंत परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी विनंती बॅनर्जी यांनी केली आहे.