कर्नाटकने पाच महिन्यानंतर हटवले प्रवासी वाहतूक संबंधी सर्व निर्बंध


बंगळुरु : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर आता पाच महिन्यांनंतर कर्नाटकात प्रवासी वाहतूक संबंधी सर्व निर्बंध हटविण्यात आल्यामुळे कर्नाटकमध्ये आता ई-पास किंवा 14 दिवस क्वारंटाईनची देखील आवश्यकता नाही. राज्य गृह मंत्रालयाच्या ताज्या मार्गदर्शक सूचनांचे निर्बंध हटविल्यानंतर अनुसरण केले जात आहे.

सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार, कर्नाटकात प्रवेशासाठी लोकांना सेवा सिंधू पोर्टलवर पास घेण्याची गरज भासणार नाही. तसेच कर्नाटकात सीमा, बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळांवर वैद्यकीय तपासणीवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटकात आता कोणत्याही निर्बंधाशिवाय रस्ता, रेल्वे किंवा हवाई मार्गाने जाता येणार आहे.

कर्नाटकमध्ये दाखल झाल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसल्यास तर ती व्यक्ति १४ दिवस होम क्वारंटाईन न राहता कामावर जाऊ शकते किंवा बाहेर फिरू शकते. पण, त्या व्यक्तीला १४ दिवस स्वत:चे निरीक्षण करावे लागेल. लक्षणे जर दिसली तर त्या व्यक्तीला सेल्फ आयसोलेट होऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल, असे सरकारी आदेशात म्हटले आहे.

त्याचबरोबर मूलभूत कोविड -१९ चे नियम कर्नाटकातील लोकांना पाळावे लागतील. म्हणजेच मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, साबण- पाणी किंवा सॅनिटायझरने हात धुणे यासारखे नियम पाळावे लागतील. यापूर्वी कर्नाटकात १४ दिवस क्वारंटाईन आवश्यक होते आणि प्रवाशांवर नजर ठेवण्याचा नियम होता. सेवा सिंधू अधिकाऱ्यांच्या मते कर्नाटकात येण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत या पोर्टलमध्ये ११ लाख लोकांनी नोंदणी केली.