काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये सहभागी झालेले राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. येथे त्यांची भेट सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी झाली नाही, मात्र संघाच्या अन्य पदाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. सिंधिया यांनी आरएसएसचे संस्थापक हेडगेवार यांच्या निवासस्थानाला देखील भेट दिली. त्यांनी रेशमबाग येथील स्मृति मंदिर परिसराला देखील भेट दिली.
सिंधियांनी पहिल्यांदाच दिली आरएसएस मुख्यालयाला भेट, म्हणाले, येथे राष्ट्राच्या प्रती समर्पणाची प्रेरणा मिळते
पहिल्यांदाच संघाच्या मुख्यालयात पोहचलेले ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, हे राष्ट्राच्या प्रती असलेल्या समर्पणाच्या भावनेचे केंद्र आहे. येथे राष्ट्राच्या प्रती समर्पणाची प्रेरणा मिळते. येथे येऊन नवीन उर्जा मिळते.
काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, हा मुद्दा काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. यावर मी काहीही टिप्पणी करू शकत नाही. मी भाजपचा कार्यकर्ता असून, कोणत्याही दुसऱ्या राजकीय पक्षाच्या अंतर्गत मुद्यावर भाष्य करणे योग्य समजत नाही.
आतापर्यंत काँग्रेसमध्ये असलेले सिंधिया काही दिवसांपुर्वीच भाजपमध्ये आले आहेत. त्यानंतर आता त्यांनी पहिल्यांदाच संघ मुख्यालयाला भेट देत भाजपशी अधिक जवळीकता वाढवत असल्याचेच संकेत आहेत.