ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकार्‍यांवर मास्क न लावता आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


पुणे : पुण्यात सध्या फिरत्या विसर्जन हौदांचा वाद चांगलाच पेटला असून विसर्जनासाठी वापरण्यात येणारे फिरते हौद हे कचरा कुंड्या असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ भलतेच संतापले आहेत. काल महापौरांनी थेट कचराकुंडी आणि फिरते हौद समोरासमोर आणून विरोधकांना प्रतिउत्तर देत खोटे पाडण्याचा जोरदार प्रयत्न केला.

ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकार्‍यांना गणेश विसर्जनासाठी कचर्‍याच्या कुंड्या पाठवून गणेश भक्तांच्या भावना दुखविल्याच्या कारणावरुन मास्क न लावता आंदोलन करणे चांगलेच महागात पडले. त्याचबरोबर त्यांच्यावर फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्याने विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्राह्मण महासंघाच्या आनंद कन्हैयालाल दवे (वय ४७, रा. गुरुवार पेठ), निलेश श्रीकांत जोशी (वय ३९, रा. आनंदनगर, वडगाव), मनोज सदाशिव तारे (वय ४४, रा. कळस), तुषार नंदकुमार निंबर्गी (वय २८, रा. शिवणे), सौरभ मनोहर वैद्य (वय २६, रा. मांजरी), दिलीप सुरेश तांबेकर (वय ५२, रा. कोथरुड) या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन कंटेनरमध्ये गणेश विसर्जनाची सोय महापालिकेने केली आहे. पण त्या कचऱ्याच्या कुंड्या असून त्यामुळे गणेश भक्तांच्या भावना दुखवल्याचा दावा करत ब्राह्मण महासंघाच्या या पदाधिकार्‍यांनी महापालिकेसमोर सोमवारी आंदोलन केले होते. त्यात त्यांनी महापालिकेचे प्लॅस्टिकचे फोटो असलेला फलक पाण्याच्या बादलीत बुडविला. पुणे महानगर पालिका निषेध असो अशा घोषणा दिल्या.

त्यांनी हे आंदोलन करण्यासाठी पूर्व परवानगी घेतली नव्हती. त्याचबरोबर सहपोलीस आयुक्तांच्या आदेशाचा भंग करुन तोंडाला मास्क न लावता कोरोनाचा संसर्ग होईल, असे घातकी कृत्य करुन आंदोलन केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला. त्या सर्वांना फरासखाना येथे घेऊन गेल्यानंतर त्यांची नोंद करुन घेऊन जामिनावर सर्वांची सुटका केली आहे.