काँग्रेसने दिला पुरावा; भाजप अजूनही करत आहे बंदी घातलेल्या चिनी अॅपचा वापर


मुंबई – जून महिन्यात लडाखमधील गलवाण खोऱ्यात भारत आणि चीन लष्करामध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर सत्ताधारी मोदी सरकारने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. गृहमंत्रालयाने या अ‍ॅपवर राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत बंदी घालण्यात येत असल्याचे स्पष्ट केले होते. पण त्यानंतर या बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅपचा खुद्द भाजपकडूनच वापर होत असल्याचे ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. महाराष्ट्र भाजपला सावंत यांनी गद्दार असे म्हटले आहे. सचिन सावंत यांनी महाराष्ट्र भाजपने जारी केलेले एक प्रसिद्ध पत्रक ट्विट केले असून हे पत्रक बंदी घालण्यात आलेल्या ५९ अ‍ॅपच्या यादीत असणाऱ्या कॅमस्कॅनने केलेले आहे.

ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यसमितीसाठी करण्यात आलेल्या नियुक्ती संदर्भातील यादी भाजपने प्रसारमाध्यांसाठी जारी केली. कॅमस्कॅनच्या मदतीने ही यादी स्कॅन करुन पाठवण्यात आल्याची टीका सावंत यांनी केली आहे. कॅमस्कॅनचा लोगो या यादीच्या खाली दिसत आहे.

सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही कॅमस्कॅनने शेअर केलेली यादी ट्विट करत जाहीर निषेध! गद्दार महाराष्ट्र भाजप मोदी सरकारने बंदी घातलेले कॅमस्कॅनर अ‍ॅपचा अजूनही राजरोसपणे वापर करत आहे. चिनी अ‍ॅपवर बंदी आणि आत्मनिर्भर अभियान ही सर्व धूळफेक आहे. भाजपचे चीनबद्दलचे प्रेम ओसंडून वाहणारे आहे हे स्पष्ट होत असल्याचा टोला लगावला आहे.