कर्नाटकातील काँग्रेसच्या संकटमोचकाला कोरोनाची लागण


नवी दिल्ली – देशात कोरोनाने थैमान घातले असून या जीवघेण्या रोगाने आत्तापर्यंत सर्वसामान्य लोकांना आपले लक्ष्य केलेले असतानाच आता राजकीय नेते देखील याच्या विळख्यात अडकण्यास सुरुवात झाली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि कैलाश चौधरी यांनी देखील याआधी कोरोनाची लागण झाली आहे.

कर्नाटकमधील काँग्रेसचे ‘संकटमोचक’ अशी ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. डी. के. शिवकुमार यांच्या कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांना उपचारासाठी बंगळुरूतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डी. के. शिवकुमार यांचा कर्नाटकातील सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये समावेश होता. त्यांनी 2013 मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली 250 कोटींची मालमत्ता जाहीर केली होती, त्यामध्ये आता वाढ होऊन जवळपास 600 कोटी एवढी तकी झाली आहे. आज डी. के. शिवकुमार काँग्रेसबरोबर असले तरी त्यांनी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्याविरुद्ध निवडणूक लढवून राजकारणात पहिले पाऊल टाकले. त्यांनी 1985 मध्ये वोक्कालिंगा समाजाचे मोठे नेते एच.डी. देवेगौडा यांच्याविरुद्ध वयाच्या पंचविसाव्या वर्षी निवडणूक लढविली होती.