संशोधकांचा दावा; संक्रमित आईच्या दूधात कोरोनारुग्णांना वाचवण्याची क्षमता

कोरोना व्हायरस महामारीच्या लढाईत वैज्ञानिकांना लस, औषध व अन्य उपचारत यश मिळताना दिसून येत आहे. कोरोनाच्या उपचारासाठी अनेक औषधे देखील बाजारात आहेत. आता वैज्ञानिकांना आईच्या दूधात कोरोना व्हायरसशी लढण्याची क्षमता असल्याचे आढळले आहे. संक्रमित होऊन बरे झालेल्या महिलांच्या दूधात अँटीबॉडीज मिळाल्यानंतर वैज्ञानिक या दिशेने संशोधन करत आहेत की ब्रेस्ट मिल्कने कोरोनाग्रस्तांना बरे करता येईल.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, कोरोनारुग्णांना बरे करण्यासाठी आता आईच्या दूधाची मदत घेतली जाईल. कोरोनातून बरे झालेल्या 30 महिलांच्या दूधात अँटीबॉडी आढळल्याने डच वैज्ञानिकांनी याचे संशोधन करत आहे. संशोधक प्लाझ्मा थेरेपी प्रमाणेच ब्रेस्ट मिल्कचा वापर करून रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याची योजना बनवत आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की, ब्रेस्ट मिल्कचे आइस क्यूब म्हणजे बर्फाचे तुकडे बनवून रुग्णांना दिल्यास, त्यांच्यात रोगप्रतिकार शक्ती वाढेल. डच ब्रेस्ट मिल्क बँकेच प्रमुख आणि या अभ्यासाचे संशोधक व्रिट सॅम यांच्यानुसार, आइस क्यूब चघळल्याने रुग्णांच्या शरीरातील सर्व म्यूकस मेंबरेसमध्ये अँटीबॉडी पोहचेल. शरीराच्या श्वसन तंत्र आणि अन्य भागांचा व्हायरसपासून बचाव करण्याची जबाबदारी म्यूकसकडे असते. यात अँटीबॉडी प्रोटीन असल्यास कोरोना व्हायरस शरीरात शिरकाव करू शकणार नाहीत.

संशोधक ब्रिट व्हॅन कुलेन म्हणाले की, घरातच ज्या कोरोनाग्रस्त वृद्धांवर उपचार केले जात आहे त्यांना हे आइस क्यूब दिल्याने खूप फायदा होईल. सोबतच ज्यांची प्रकृती गंभीर आहे, अशांना देखील यामुळे फायदा होईल. संशोधकांना ब्रेस्ट मिल्कमध्ये शक्तीशाली अँटीबॉडी आढळल्या. याद्वारे लोकांच्या शरीरात व्हायरसविरोधात इम्यूनिटी निर्माण करणे शक्य होईल.

यासाठी या वैज्ञानिकांनी महिलांना दूध दान करण्यास देखील सांगितले आहे. जेणेकरून, याबाबत संशोधन करता येईल. हा अभ्यास नेदरलँडमधील एमा चिल्ड्रन्स हॉस्पिटल आणि अन्य हॉस्पिटलद्वारे मिळून केले जात आहे. याचा पहिला टप्पा एप्रिलमध्ये सुरु झाला होता.