गुजरात सरकारकडून १५ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या आमदाराची पोलीस तक्रार केंद्रांचा सदस्य म्हणून नियुक्ती


अहमदाबाद – २६ जिल्ह्यांमध्ये ४६ आमदारांचा समावेश असणाऱ्या जिल्हा पोलीस तक्रार केंद्रांची गुजरात सरकारने स्थापना केली असून या केंद्रांची स्थापना गुजरात पोलीस कायदा २००७ नुसार करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कायद्यानुसार पोलीस तक्रार केंद्र स्थापन केले जाणार आहे. पण नियुक्त करण्यात आलेल्या या ४६ आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कंधाल जडेजा यांचे सर्वाधिक धक्कादायक आणि चर्चेतील नाव आहे. पोरबंदर जिल्ह्यातील कुतियाना विधानसभा मतदारसंघाचे कंधाल जडेजा हे आमदार आहेत.

‘गॉडमदर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘संतोखबेन जडेजा’ यांचे कंधाल हे पुत्र आहेत. कंधाल यांच्याविरोधात १५ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही पोरबंदर जिल्हा पोलीस तक्रार केंद्राचे सदस्य म्हणून कंधाल यांचा समावेश करुन घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कंधाल यांच्याबरोबरच भाजपचे आमदार आणि गुजरात सरकारमधील माजी मंत्री बाबू बोखिरिया यांचाही सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. बंदुकीचा धाक दाखवणे, विस्फोटक सामान बाळगणे, खंडणी, मारहाण, फसवणूक आणि पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासारखे गंभीर गुन्हे कंधाल यांच्याविरोधात दाखल असल्याचे इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.