मोबाईलसारखी कुठेही चार्ज करता येणार ओकिनावाची ही नवी स्कूटर


भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक स्कूटर बनविणारी कंपनी ओकिनावाने आपली नवीन ओकिनावा R30 स्कूटर दाखल केली असून ही स्कूटर स्लो स्पीड कॅटेगरीमधील आहे. ओकिनावाने या स्कूटरमध्ये भारतीयांची चार्जिंगसाठी होणारी मुख्य अडचण सोडविली आहे.

58992 रुपये ऐवढी या स्कूटरची एक्स शोरुम किंमत आहे. लाँचिगसोबतच या स्कूटरची बुकिंग देखील कंपनीने सुरु केली आहे. ग्राहक 2000 रुपये टोकन देऊन ही स्कूटर बुक करू शकणार आहेत. या स्कूटरचा सर्वाधिक वेग हा 25 किमी प्रति तास असल्यामुळे तिला लो स्पीड कॅटेगरी देण्यात आली आहे. य़ामध्ये 1.25 किलोवॉटची लिथियम आयनची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी काढून मोबाईलसारखी कुठेही चार्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे घरातील साध्या प्लगवरही ती चार्ज करता येणार आहे.

Okinawa Scooters

कंपनीने या स्कूटरबाबत केलेल्या दाव्यानुसार ही बॅटरी 4 ते 5 तासात फुल चार्ज होणार आहे. यानंतर ती एका चार्जिंगमध्ये 60 किमी धावणार आहे. म्हणजेच 2 ते 2.5 तासाच्या चार्जिंगमध्ये ही स्कूटर 30 किमी अंतर कापणार आहे. ही बॅटरी चार्ज करण्य़ासाठी 1 तासाला 1 युनिट खर्च होतो. म्हणजेच पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 युनिट वीज लागणार आहे. जर एका युनिटचा खर्च 7 ते 8रुपये आहे तर 5 युनिटसाठी 40 रुपये खर्च होणार आहेत. म्हणजेच 40 रुपयांच्या खर्चात तुम्ही 60 किमी जाऊ शकणार आहात. स्कूटरसोबत मिळणारा चार्जर ऑटो कट फंक्शनचा आहे. तर कंपनी बॅटरीवर 3 वर्षांची वॉरंटी देत आहे. स्कूटरमध्ये वापरण्यात आलेली 250 वॉटची BLDC इलेक्ट्रिक मोटरवर 3 वर्षे किंवा 30,000 किमीची वॉरंटी देण्यात येणार आहे.

अलॉय व्हील्स, डिजिटल इंस्ट्रूमेंट डिस्प्ले या स्कूटरमध्ये देण्यात आला आहे. त्याचबरोबर ही स्कूटर पाच रंगात उपलब्ध होणार असून यामध्ये व्हाइट, ग्लॉसी व्हाइट, ग्लॉसी रेड, मेटॅलिक ऑरेंज, सी ग्रीन आणि सनराइज यलो या रंगांचा समावेश असणार आहे. सुरक्षेसाठी यामध्ये ड्रम ब्रेकसोबत ई-एबीएस (इलेक्ट्रॉनिक असिस्टेड ब्रेकिंग सिस्टम) देण्यात आले आहे. ही स्कूटर 150 किलोचे वजन वाहून नेऊ शकते.