हरियाणात सुरु होणार गाढविणीच्या दुधाची देशातील पहिली डेअरी, एक लीटरची थक्क करणारी किंमत


दुध पिण्याचे अनेक फायदे आहेत, हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहेत. त्यातच आपल्याकडे सध्याच्या घडीला गायीचे, म्हशीचे आणि बकरीचे अशा तीन प्रकारचे दुध उपलब्ध आहे. त्यातच त्यांची उपयुक्तता त्यांच्यातील विविध घटकांनुसार ठरवली जाते आणि त्यानुसार त्यांची किंमत देखील ठरवली जाते. पण देशात आता लवकरच गाढविणीच्या दुधाची पहिली डेअरी सुरु होणार आहे. देशातील पहिली गाढविणीच्या दुधीची डेअरी हरियाणाच्या हिस्सार या शहरात सुरु होणार आहे.

या दुधाची डेअरी हरियाणामधील हिसारच्या नॅशनल हॉर्स रिसर्च सेंटरमध्ये सुरू करण्यात येणार असून मोठ्या प्रमाणावर त्याचे उत्पादन घेतले जाणार आहे. या डेअरीतून हलारी जातीच्या गाढविणींचे दूध विकले जाणार आहे. या डेअरीमध्ये त्यासाठी हलारी जातीच्या १० गाढविणी देखील आणण्यात आल्या आहेत. गाढविणीच्या दुधाची डेअरी देशात पहिल्यांदाच सुरु होत असून अशा प्रकारचे दुध विकले जाणार आहे. त्याचबरोबर गाढविणीच्या दुधाची प्रति लिटर किंमत ७००० रुपये असणार आहे. अनेक पोषक घटक गाढविणीच्या दुधात असल्यामुळेच त्याची किंमत एवढी जास्त असल्याचे सांगितले जात आहे.

रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक गाढविणीच्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. त्याशिवाय कॅन्सरसारख्या मोठ्या आजारांचा सामना करण्याची देखील क्षमता असल्याचे सांगितले जात आहे. विविध सौंदर्य प्रसाधने देखील गाढविणीच्या दुधापासून तयार केली जातात. या डेअरीचे काम लवकरच सुरू होऊन हे दूध बाजारात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे.