दक्षिण कोरियाचा दावा; हुकुमशाह किम जोंग उन कोमामध्ये


सेऊल – उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन हे गेल्या काही काळापासून चर्चेच्या माध्यमांमध्ये होते. किम जोंग कधी त्यांच्या प्रकृतीवरुन तर कधी शेजारी राष्ट्राला दिलेल्या धमकीवरून चर्चेत आले होते. पण किम जोंग उन यांच्या नावाची आता पुन्हा एकदा चर्चा होत असून दक्षिण कोरियाकडून ते कोमामध्ये असल्याचा दावा करण्यात आल्यामुळे त्यांची बहिण किम यो जोंग या राष्ट्राची धुरा आपल्या हाती घेणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूयॉर्क पोस्टने दिले असून किम जोंग उन यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. पण त्यानंतर त्यांनी या चर्चांना एका प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी सर्वांसमोर येऊन पूर्णविराम दिला होता.

दक्षिण कोरियाचे माजी गुप्तचर अधिकारी चांग सोंग मिन यांनी कोरियातील एका माध्यमाशी बोलताना आपल्या माहितीनुसार किम जोंग उन हे सध्या कोमाममध्ये असून त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची बहिण किम यो जोंग देशाची धुरा सांभाळत असल्याची माहिती दिली. यापूर्वी दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष किम देई जुंग यांच्यासोबत त्यांचे विशेष सहाय्यक म्हणूनही मिन यांनी काम केले आहे. किम यो जोंग यांची सत्ता सांभाळण्याची पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही किम जोंग उन यांच्यासोबत काम केले आहे

आतापर्यंत संपूर्ण सत्ता सोपवण्यात किम यो जोंग यांच्या हाती आली नाही. त्यांच्याकडे ही जबाबदारी नेतृत्वाचे संकट अधिक काळासाठी सुरू राहू नये आणि सरकार चालवण्यातील अनेक गोष्टी त्यांना समजाव्या म्हणून सोपवण्यात आल्याचेही मिन यांनी सांगितले. गेल्या महिन्यात सरकारमध्ये किम यो जोंग या दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान, किम जोंग उन यांनी किम यो जोंग यांना आतापर्यंत आपले उत्तराधिकारी म्हणून घोषित केलेले नाही.

दक्षिण कोरिया उत्तर कोरियामध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालीवर नजर ठेवून आहे. किम जोंग उन हे ज्यावेळी कोमात असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर दक्षिण कोरियातील गुप्तचर यंत्रणेची एक बैठक पार पडली. किम यो जोंग यांच्या हाती सत्ता आल्याच्या वृत्तात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. किम यो जोंग या यापूर्वीपासून किम जोंग उन यांच्या पक्षाच्या केंद्रीय समितीची जबाबदारी सांभाळत असल्याची माहिती वृत्तसंस्था योनहापने दिली.