काँग्रेसच्या अध्यक्षपदावर सोनिया गांधी कायम, 6 महिन्यात नवीन अध्यक्षांची निवड

काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आज पार पडली असून, सोनिया गांधी याच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचे एकमत बैठकीत झाले. सोबतच पुढील 6 महिन्यात नवीन अध्यक्ष निवडला जाणार आहे. बैठकी दरम्यान काँग्रेस नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

यावेळी सोनिया गांधी यांनी आपल्याला पक्षाच्या अध्यक्षपदावर आता राहायचे नाही असे स्पष्टपणे सांगितले. मात्र अनेक नेत्यांनी त्यांना या पदावर कायम राहण्याचा आग्रह केला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एके अँटनीसह अनेक नेत्यांनी सोनिया गांधींना पदावर कायम राहण्याचे आवाहन केले होते.

वर्किंग कमिटीच्या बैठकीच्या 2 आठवडे काँग्रेसमधील जवळपास 23 नेत्यांनी नेतृत्वबदलाची मागणी केली होती. बैठकीत या पत्रावरून देखील राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांवरच निशाणा साधला. पत्र लिहिण्यासाठी हीच वेळ का निवडली ? असा प्रश्न त्यांनी केला. सोबतच नेत्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली असल्याचे वक्तव्य राहुल गांधींनी बैठकीत केलेच नसल्याचे देखील काँग्रेसने स्पष्ट केले.