चीनमधील गुंतवणूक बंद करण्याचा ‘सौदी अरामको’ने घेतला निर्णय; १० अब्ज डॉलर्सचा करार रद्द


रियाध – जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाची तेल कंपनी ‘अरामको’ने चीनसोबतचा १० अब्ज डॉलर्सचा करार रद्द करण्याचा निर्णय घेत एकाप्रकारे चीनला मोठा झटका दिला आहे. अरामको चीनसोबत या कराराअंतर्गत एक रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणार होती, पण हा करार रद्द केल्यामुळे चीनला मोठा झटका बसला आहे.

जगभरात मागील ६ महिन्यांपासून थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किंमतीतही घसरण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान या कंपन्यांना सोसवे लागत आहे. यासंदर्भात ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार आपल्या चीनमधील गुंतवणुकदारांशी केलेल्या चर्चेनंतर अरामकोने चीनच्या पूर्वोत्तर प्रांतातील लिओनिंगमध्ये गुंतवणूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाशी निगडीत काही लोकांनी नाव न छापण्याच्या अटीवर ब्लूमबर्गला बाजारातील अनिश्चितता यामागे कारण असल्याचे सांगितले.

सध्या यासंदर्भात कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास अरामकोने नकार दिला आहे. तर यावर कोणतीही प्रतिक्रिया गुंतवणुकदारांपैकी एक असलेल्या चायना नॉर्थ इंडस्ट्रिज ग्रुप कॉर्पोरेशनने देखील दिली नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या क्षेत्रातील कंपन्यांचे गणित बिघडले असल्याचे म्हटले जात आहे. कच्च्या तेलाची किंमत आणि वाढत्या कर्जाच्या पार्श्वभूमीवर ७५ अब्ज डॉलर्सचे डिविडंट कायम ठेवण्यासाठी अरामको आपल्या खर्चात कपात करण्याची योजनाही तयार करत आहे.

कच्च्या तेलाच्या मागणीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे झालेली घट आणि कमी झालेला नफा यामुळे रिफायनरींना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्यामुळे गुंतवणुकींच्या दृष्टीकोनातही मोठा बदल होत आहे. या वर्षांच्या सुरूवातीला रिफायनरीच्या विस्ताराच्या योजनेसाठी सौदी अरामकोने इंडोनेशियाच्या एका कंपनीशी चर्चा केली होती. पण त्यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली होती.