काँग्रेसचे नेतृत्व करण्यास राहुल गांधींचा नकार कायम


नवी दिल्ली – सध्या देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये नेतृत्वावरुन वाद सुरु असून हंगामी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना काही ज्येष्ठ नेत्यांनी सामूहिक नेतृत्वाची मागणी करणारे पत्र पाठवल्यानंतर काँग्रेसमधील गांधी परिवाराशी एकनिष्ठ असलेल्या निष्ठावान कार्यकर्ते तसेच नेते सक्रिय झाले असून, राहुल गांधी यांच्या हाती पुन्हा पक्षाची धुरा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान आज काँग्रेस कार्यसमितीची बैठक होणार असून त्यात अध्यक्षपदाविषयी काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. अध्यक्षपदी राहुल गांधी यांच्या नियुक्तीची मागणी होत असली तरी या पदासाठी ते स्वत: इच्छुक नसल्याचे समजते. सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. गांधी परिवाराबाहेरील व्यक्तीची अध्यक्षपदी नियुक्ती करा अशी त्यांची भूमिका आहे. त्याचबरोबर पक्षाचे हंगामी अध्यक्ष डॉ. मनमोहन सिंग किंवा ए.के.अँटोनी यांना बनवावे. कोरोनाची साथ संपल्यानंतर पक्षाचे अधिवेशन बोलवून त्यात पुन्हा राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड करावी, अशी चर्चा काँग्रेसमध्ये सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्याचबरोबर पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली, भूिपदर हुड्डा, आनंद शर्मा, कपिल सिबल, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, शशी थरूर आदी २३ काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे केली. सोनिया किंवा राहुल गांधी यांच्यावर पत्रात प्रत्यक्ष टिप्पणी करण्यात आलेली नाही, पण जनतेशी संपर्कात राहणाऱ्या सक्रिय नेतृत्वाची पक्षाला गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे.

सोनिया गांधी यांनी या पत्राची दखल घेतली असून अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दाखवली आहे. नेत्यांनी एकत्रितपणे नवा पक्षाध्यक्ष नेमावा, आपण ही धुरा सांभाळू इच्छित नाही, असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले आहे. तर दूसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री अमिरदर सिंग, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, ज्येष्ठ नेते सलमान खुíशद, अश्विनीकुमार यांनी मात्र वेगळा सूर आळवत गांधी कुटुंबाला पाठिंबा दर्शवला आहे.