काल दिवसभर नेटकऱ्यांच्य रडारावर PhonePe हे डिजिटल पेमेंट अॅप होते. या अॅपविरोधात लोकांनी एवढा राग व्यक्त केला की ट्विटरवर #UninstallPhonePay हा हॅगटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. पण नेटकरी या अॅपवर भडकण्याचे कारण शोधले असता, या अॅपचे आमिर खान आणि आलिया भट हे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. पण मागील काही दिवसांपासून आलिया व आमिर दोघेही वेगवेगळ्या मुद्यावरून नेटकऱ्यांच्या रडारावर होते.
‘नेपोटिझम’च्या वादात अडकले PhonePe; नेटकऱ्यांनी केली आलिया-आमिरला हटवण्याची मागणी
त्यातच आलिया भट सोशल मीडियावर सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर नेपोटिजमच्या मुद्यावरून ट्रोल होत आहे. त्याचबरोबर आलियाचे वडील महेश भट यांचे नाव सुशांत प्रकरणात अप्रत्यक्षपणे आल्यानेही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलिया आली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानची पाठराखण करणा-या तुर्कीच्या फर्स्ट लेडी एमीन इर्दोगान यांची भेट घेतल्यामुळे आमिर खान हा ट्रोल होत आहे. अशात PhonePe ने या दोघांनाही ब्रँड अॅम्बेसेडर बनवल्याचे पाहून नेटक-यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन पोहचली. त्याचमुळे काल दिवसभर नेटकऱ्यांनी ‘PhonePe’ Uninstall करण्याची मागणी लावून धरली.
‘देशद्रोही’ आमिर खान आणि ‘नेपोकिड’ आलिया भट यांना ‘PhonePe’ने ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे, तेव्हा हे अॅप डिलीट करा, असे एका युजरने लिहिले. त्याचबरोबर ‘PhonePe’ Uninstall करा, देशासाठी काही करा, म्हणत वेगवेगळे स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत. यावरून अनेक मीम्सही शेअर करण्यात आल्यामुळे ट्विटरवर #UninstallPhonePay हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. आमिर व आलियाला ‘PhonePe’ने ब्रँड अॅम्बेसेडर बनवल्यानंतर दोघांच्या जाहिरातींनी छोट्या पडद्यावर धुमाकूळ घातला आहे. ‘PhonePe’च्या जाहिरातीत आमिर व आलियाने एकत्र काम केले आहे.