मेडिकलची प्रवेश परीक्षा नीट आणि इंजिनिअरिंगची प्रवेश परीक्षा जेईईची तारीख पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका फेटाळत परीक्षा ठरलेल्या तारखेलाच होणार असल्याचे म्हटले आहे. सरकारने देखील याची पुष्टी केली आहे. आता यावरून भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारला घरचा आहेर देत परीक्षा आयोजित करणे ही मोठी राजकीय चूक असल्याचे म्हणत, याची तुलना नसबंदीशी केली आहे.
‘नीट-जेईई परीक्षांचे आयोजन करणे ही नसबंदीसारखी चूक असेल’
सुब्रमण्यम स्वामी हे केंद्राकडे जेईई मेन आणि नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी करत म्हणाले की, या परीक्षा आयोजित केल्यास ही मोठी राजकीय चूक ठरेल. हा निर्णय सरकारला 1977 मध्ये नसबंदीच्या निर्णयाने इंदिरा गांधी सरकारवर परिणाम केला होता, तसाच परिणाम करेल.
सुब्रमण्यम स्वामी ट्विट करत म्हणाले की, मतदारांची स्मरणशक्ती खूप तिक्ष्ण असते व ते या गोष्टीला कधीही विसरणार नाहीत.
दरम्यान, जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान पार पडणार असून, नीटची परीक्षा 13 सप्टेंबरला आयोजित करण्यात आलेली आहे.