नीरज सिंहचा धक्कादायक खुलासा; सलग तीन दिवस सुशांतने केले होते गांजाचे सेवन?


सीबीआयने अभिनेत सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यापासून या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यातच आता सुशांतच्या हाऊसकिपर नीरज सिंहने एक धक्कादायक खुलासा केला असून नीरजने चौकशीदरम्यान सुशांत गांजाचे सेवन करत होता, असे सांगितल्याचे ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. पण त्याने आत्महत्या करण्यापूर्वी गांजाचे सेवन केले होते. त्याचबरोबर मृत्युपूर्वी सलग तीन दिवस सुशांतने गांजा ओढल्याचे नीरजने केलेल्या दाव्यात म्हटले आहे.

आठवड्यातून एक-दोन वेळा तरी सुशांत घरी पार्टी करायचा. रिया, आयुष या पार्टीत असायचे आणि या पार्टीत ते बऱ्याच वेळा दारू, गांजा, सिगारेट ओढायचे. तसेच सुशांतसाठी गांजाचा रोल सॅम्युअल जेकब तयार करुन द्यायचे. मीदेखील कधी-कधी तयार करुन द्यायचो. त्याचबरोबर सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी तीन दिवस आधी गांजाचे रोल केले होते. हे रोल तो कायम घरात असलेल्या जिन्याच्या खालच्या कपाटात ठेवत होता. त्यामुळे सुशांतचे निधन झाल्याचं लक्षात येताच प्रथम मी कपाटातील गांजाचा बॉक्स पाहिला. पण त्यातील सगळे रोल संपले होते, असे नीरज चौकशीत म्हणाला.

नीरज पुढे म्हणाला की, मी सुशांतकडे नोकरीसाठी एका ओळखीच्या माणसाच्या मदतीने लागलो होतो. पण मला सुशांतकडील नोकरी काही आजारपणामुळे सोडावी लागली. पण माझ्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर सुशांतच्या मॅनेजरने सॅम्युअल जेकबने पुन्हा मला कामावर बोलावले.

दरम्यान, अलिकडेच एक धक्कादायक खुलासा सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने केला होता. १३ जून रोजी सुशांतकडे कोणतीच पार्टी झाली नव्हती. त्याचबरोबर त्या दिवशी त्याच्या घराचे लाईट्सदेखील १०.३०-११ च्या दरम्यान बंद झाले होते. विशेष म्हणजे सुशांतच्या घराचे लाईट्स एवढ्या लवकर कधीच बंद होत नसल्याचेही तिने सांगितले.