सर्वसामान्यांना मोदी सरकारचा दिलासा; कमी होणार गृहोपयोगी वस्तूंचे दर


नवी दिल्ली: मोदी सरकारने सर्वसामान्यांना काहीसा होईना पण दिलासा दिला आहे. कारण मोदी सरकारने गृहोपयोगी वस्तू असलेल्या तेल, टूथपेस्ट आणि साबणावरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला असून, या संदर्भातील माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. २९.३ टक्के एवढा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) केशतेल, टूथपेस्ट आणि साबण यांच्यावर यापूर्वी आकारला जात होता. पण या गृहोपयोगी वस्तुंवर आता १८ टक्के जीएसटी द्यावा लागणार असल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

मोदी सरकारने दैनंदिन जीवनात कामी येणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आहे. त्यामुळे केशतेल, साबण आणि टूथपेस्ट स्वस्त होणार आहे. कोरोना संकटामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने गृहोपयोगी वस्तूंचे दर कमी केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लागू आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील कोट्यावधी नागरिकांचे हाल झाले आहेत. गहू, तांदूळ, चणा डाळ सरकारकडून देण्यात येत असली, तरी घरातील इतर वस्तूंवर होणारा खर्च मोठा असल्यामुळेच सरकारने काही वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.