चीनसोबत चर्चा अयशस्वी ठरल्यास ‘लष्करी’ पर्याय खुला – जनरल रावत

लडाख एलएसीवर चीनसोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरू आहेत. मात्र असे असले तरी चीन मागे हटताना दिसत नाही व आपल्या खुरापती सुरूच ठेवल्या आहेत. यावरून आता चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी लडाखमध्ये चीनसोबत सैन्य आणि राजकीय स्तरावरील चर्चेनंतर यशस्वी समाधान न झाल्यास, भारताकडे लष्करी पर्याय असल्याचे म्हणत चीनला थेट इशाराच दिला आहे.

भारत-चीनमध्ये आतापर्यंत 5 वेळा चर्चा झाली आहे, मात्र अद्याप याचे समाधान झालेले नाही. जनरल रावत म्हणाले की, लडाखमध्ये चीनी सैन्य आणि त्यांच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी लष्करी पर्याय देखील आहे. मात्र सैन्य आणि अधिकारी स्तरावरील चर्चेनंतरही काही समाधान न झाल्यासच याचा वापर केला जाईल. मात्र त्यांनी लष्करी पर्यायाविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

भारत-चीनमध्ये एप्रिल-मे महिन्यापासून सुरू झालेल्या सीमा तणावाचे रुपांतर सैन्य संघर्षात झाले होते. या संघर्षात भारताचे अनेक सैनिक शहीद झाले होते. यानंतर दोन्ही देशांमध्ये अधिकारी, सैन्य स्तरावर अनेकदा चर्चा झाल्या. चीन त्या भागातून मागे हटण्यास तयार देखील झाले होते. मात्र अद्याप या भागातून मागे हटले नसल्याचे समोर आले आहे.