जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यास अमेरिका चीनच्या ताब्यात जाईल – डोनाल्ड ट्रम्प


वॉशिंग्टन – डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यास चीनच्या ताब्यात अमेरिका जाईल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेने मागील साडेतीन वर्षांपासून चीनविरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेचे समर्थन करताना केवळ आपण चीनला उघडपणे विरोध केल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी निवडणुकीसंदर्भात दिलेल्या मुलाखतीमध्ये रविवारी हे भाष्य केले असून असोसिएट प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी चीन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करु शकतो, अशी शक्यता गुप्तचर विभागाने व्यक्त केल्याचा संदर्भही दिला आहे. चीन डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांना निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न करत असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. निवडणुकीत जो बायडेन निवडून आले तर आपला देश चीनच्या ताब्यात जाईल. मागील साडेतीन वर्षांच्या कारभार पाहिला तर चीन विरोधात बोलणार मी एकमेव राष्ट्राध्यक्ष होतो असे दिसेल.

मी गुप्तचर यंत्रणांना दिलेला अहवाल पाहिला असून त्यामध्ये जो बायडेन निवडून येण्यासाठी चीन प्रयत्न करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जर तसे झाले तर आपला देश नक्कीच चीनच्या ताब्यात जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ज्या पद्धतीने चीनबरोबर आम्ही वागलो, तशी कठोर भूमिका आतापर्यंत कोणीच घेतली नसल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले.

चीनच्या प्रभावाखाली असणारे जो बायडेन हे नेते असल्याची टीकाही ट्रम्प यांनी केली. ते निवडून आल्यास संपूर्ण अमेरिकाही बिजिंगच्या ताब्यात जाईल, असे ट्रम्प म्हणाले आहेत. जो बायडेन चीनच्या ताब्यात आहेत. या निवडणुकीमध्ये माझा दारुण पराभव व्हावा अशी चीनची इच्छा असल्याचेही ट्रम्प म्हणाले आहेत. तसेच उमेदवारी स्वीकारल्यानंतर बायडेन यांनी केलेल्या भाषणामध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांच्या उल्लेख नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितलं.

गुरुवारी उमेदवार म्हणून केलेल्या पाहिल्या भाषणामध्ये बायडेन यांनी उल्लेख न केलेल्या मुद्द्यांमध्ये चीनचाही समावेश असल्याचे ट्रम्प यांनी अधोरेखित करत चीन मुद्द्यासंदर्भात बायडेन यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. चीनचा थेट किंवा अप्रत्यक्षपणेही उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरुनच ते निवडून आल्यावर चीन आपल्यावर ताबा मिळवेल हे स्पष्ट होत आहे. पण हे आपण घडू देणार नाही. तुम्ही गुप्तचर यंत्रणांचा अहवाल पाहिला असेल. जो बायडेन जिंकावे यासाठी चीन पूर्ण प्रयत्नात आहे. मी जिंकावे अशी भूमिका चीनने घेतली तर ते त्यांच्यासाठी अपमानास्पद ठरले, त्यामुळे ते अशी भूमिका घेणार नसल्याचेही ट्रम्प यांनी मुलाखतीमध्ये म्हटले आहे.