चीनचा नवा प्रयोग, किड्यांपासून बनवली कोरोना लस

जगभरात कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. भारतापासून ते ब्रिटन, अमेरिका, रशियात लसीवर काम सुरू आहे. चीनमध्ये देखील काही लसी अंतिम टप्प्यात आहेत. याच पार्श्वभूमीवर चीनने एक वेगळी लस तयार केली आहे. ही लस किड्यांच्या मदतीने बनवली जात असून, ज्याच्या मानवी ट्रायलला मंजूरी देण्यात आली आहे.

चीनच्या चंगडू येथील स्थानिक प्रशासनाने व्ही-चॅटवर एक नोटीस शेअर केली आहे. या नोटीसनुसार या लसीसाठी किड्यांच्या पेशींचा वापर करून प्रोटिन बनविण्यात आले. या लसीला सिचुआन यूनिव्हर्सिटीच्या वेस्ट चीन हॉस्पिटलने तयार केले आहे. ही चीनची पहिली अशी लस आहे, जी किड्यांपासून तयार करण्यात आली आहे.

नोटीसमध्ये या लसीचे माकडांवर करण्यात आलेल्या सुरुवातीच्या ट्रायलबाबत माहिती देण्यात आलेली आहे. या लसीत माकडांना कोणतेही साईड इफेक्ट्स जाणवले नाहीत.

दरम्यान, चीनमध्ये जवळपास 8 कोरोना लसींवर काम सुरू असून, यातील काही लसी शेवटच्या टप्प्यात आहेत. चीनच्या Ad5-nCoV या लसीला पेटेंट देखील मिळाले आहे.