काँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा; विजय वडेट्टीवार यांनी वाढवले महाविकास आघाडीचे टेंशन


मुंबई: मागील दोन लोकसभा तसेच इतर राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यातच मागील लोकसभा निवडणुकीनंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा सांभाळली. पण त्यांचा कार्यकाळ नुकताच पुर्ण झाला आहे. त्याचबरोबर पक्षाचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे आता देशातील या सर्वात जुन्या पक्षाची सूत्रे नेमकी कोणाच्या हातात जाणार याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

काँग्रेसच्या काही नेत्यांकडून राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद पुन्हा देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. तर काहींनी याला आडमार्गाने विरोध दर्शवला आहे. पण राहुल गांधींनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, असे मत महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, काँग्रेस पक्षाला सोनिया गांधींनी उभारी दिली. काँग्रेस पक्षात खऱ्या अर्थाने लोकशाही असून गांधी परिवारानेच पक्षाचे नेतृत्व करावे. तसेच पक्ष आणि देश सांभाळण्याची क्षमता गांधी परिवाराकडे असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. त्याचबरोबर काँग्रेस महाविकास आघाडीत राहुल गांधींच्या इच्छेनुसारच सहभागी आहोत. जर राहुल गांधींनी सांगितले सरकारमधून बाहेर पडा, तर बाहेर देखील पडू, असे मोठे वक्तव्य करत विजय वडेट्टीवर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे टेंशन वाढवले आहे. त्याचबरोबर विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.