रशियाचा नवा दावा; तयार केली दुसरी कोरोना प्रतिबंधक लस, कोणतेही दुष्परिणाम नाही


रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी ११ ऑगस्ट रोजी कोरोना प्रतिबंधक पहिली लस विकसित केल्याची घोषणा केली होती. त्यामुळे रशिया कोरोना विषाणूवर लस शोधणारा पहिला देश ठरला होता. त्याचबरोबर ही लस वापरण्याची परवानगीही रशियाने दिली होती. त्यापाठोपाठ आता कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी दुसरी लस विकसित केल्याचा दावा रशियाने केला आहे. यासंदर्भात डेल मेलच्या रिपोर्ट्सनुसार, पहिल्या कोरोना प्रतिबंधक लसीचे समोर आलेले साइड इफेक्ट या दुसऱ्या लसीमध्ये नसल्याचा दावा रशियाने केला आहे.

पहिल्या लसीचे नाव रशियाने Sputnik-5 ठेवले होते. तर आता नव्याने विकसित केलेल्या दुसऱ्या लसीचे EpiVacCorona असे ठेवले आहे. सायबेरियाच्या जागतिक क्लास वायरोलॉजी इंस्टीट्यूटमध्ये (वेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ वायरोलॉजी एण्ड बायोटेक्नोलॉजी) रशियाने EpiVacCorona लसीची निर्मिती केली आहे.

रशियाच्या शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, सप्टेंबरमध्ये EpiVacCorona चा क्लिनिकल ट्रायल पुर्ण होईल. आतापर्यंत ५७ जणांवर दुसऱ्या लसीचा प्रयोग करण्यात आला असून ज्यांच्यावर प्रयोग केला त्यांच्यामध्ये अद्याप कोणतेही साइड इफेक्ट दिसून आले नसून सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचा दावा रशियाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

EpiVacCorona या लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत. पहिला डोस दिल्यानंतर १४ ते २१ दिवसानंतर दुसरा डोस दिला जाणार आहे. ऑक्टोबरपर्यंत EpiVacCorona या लसीचे रजिस्टर करण्यात येईल. तर या लसीचे उत्पादन नोव्हेंबरमध्ये सुरु करण्यात येईल.

कोरोना विषाणूच्या १३ संभावित लसीवर वेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ वायरोलॉजी एण्ड बायोटेक्नोलॉजी या संस्थेने काम केले होते. या लसीची पहिल्यांदा लॅबमध्ये प्राण्यांवर चाचणी करण्यात आली. चीन, अमेरिका, भारत आणि ब्रिटनही कोरोनाची लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही देशांमध्ये कोरोनाच्या लसीच्या तीन चाचण्याही करण्यात आल्या आहेत.