झाडाखाली शाळा घेणाऱ्या शिक्षकाचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान


नवी दिल्ली – 2020 च्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी निवड झालेल्या शिक्षकांची यादी नुकतीच केंद्र सरकारने जाहीर केली असून त्यामध्ये हा सन्मान जम्मू आणि काश्मीरमधील सुनिल कुमार यांना मिळाला आहे. सुनिल कुमार यांची विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ त्यांच्या कृतीतून दिसून येते. देशातील 36 राज्य आणि केंद्रीय प्रदेशांमधून 153 शिक्षकांची केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने निवड केली आहे. ही निवड पद्धती देशात लॉकडाऊन असल्याने व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे जाहीर करण्यात आली.

जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरचे शिक्षक सुनिल कुमार यांचेही नाव केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या यादीत आले आहे. सुनिल कुमार झाकर येथील सरकारी शाळेत विद्यादानाचे काम करतात. त्यांची विद्यार्थ्यांबद्दल असेलली आत्मियता आणि तळमळ त्यांच्या कृतीतूनच पाहायला मिळते. लॉकडाऊन काळातही सुनिल कुमार यांनी विद्यार्थ्यांचे क्लास घेतले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचे काम व्रत म्हणून सुरुच ठेवल्याचे सुनिल कुमार यांनी म्हटले. तसेच, इतरवेळी सामुदायिक वर्ग घेऊन, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण देण्याचे काम करतो. कारण, उत्तम भविष्याची शिक्षण हीच गुरुकिल्ली असल्याचे कुमार यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय पुरस्कारासाठी केंद्र सरकारने निवड केल्याचा आनंदही कुमार यांनी व्यक्त केला.

जम्मू आणि काश्मीरमधील शिक्षण विभागाच्या संचालिका अनुराधा गुप्ता यांनी सुनिल कुमार यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. गुप्ता यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सुनिल कुमार यांच्या निवडीचे पत्र आणि फोटो शेअर करत ही अभिमानास्पद कामगिरी असल्याचे म्हटले आहे. हा पुरस्कार जम्मू आणि काश्मीरमधील दोन शिक्षकांना जाहीर झाला आहे. त्यामध्ये सुनिल कुमार आणि रोहिनी सुलताना या दोघांचा समावेश आहे. दरम्यान, संचालिका अनुराधा गुप्ता यांचे सुनिल कुमार यांनी त्याबद्दल आभार मानले, तसेच आपल्या सहकार्य व मार्गदर्शानामुळेच ही मजल मारता आली, असेही कुमार यांनी ट्विटरवरुन म्हटले.