‘तारक मेहता’च्या जुन्या अंजलीचा मालिकेला रामराम; ही अभिनेत्री होणार नवी अंजली भाभी


सब टीव्हीवरील लोकप्रिय आणि टीआरपीमध्ये कायमच टॉपमध्ये असणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका मागील १२ वर्षांपासून सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण यामधील काही जुने कलाकार आता हळूहळू मालिका सोडू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच रोशन सिंह सोधी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या गुरुचरण सिंह याने मालिकेला रामराम ठोकल्यानंतर आता अंजली मेहता हि व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नेहा मेहता हिने देखील मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे अंजली मेहता ही व्यक्तिरेखा आता प्रसिद्ध अभिनेत्री सुनैना फौजदार साकारताना दिसणार आहे.

यासंदर्भातील वृत्त ई टाईम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार निर्मात्यांनी सुनैना फौजदार हिची तारक मेहताची पत्नी अंजली मेहता या भूमिकेसाठी निवड केली आहे. येत्या काही काळात सुनैना मालिकेत अभिनय करताना दिसेल. पण या मालिकेत तिची एण्ट्री कशी होणार? याबाबत निर्मात्यांनी अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. गेल्या १२ वर्षांपासून नेहा मेहता तारक मेहतामध्ये काम करत आहे. पण ती सातत्याने एकच व्यक्तिरेखा साकारुन आता कंटाळली असल्यामुळे तिने मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. पण नेहाने अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.