काँग्रेस नेत्याचा दावा; माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई होऊ शकतात आसामचे मुख्यमंत्री


नवी दिल्ली – आसाममधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना मुख्यमंत्री पदाचे तिकीट मिळू शकते, असा दावा काँग्रेसच्या एका नेत्याने केला आहे. आसाममध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.

यासंदर्भातील वृत्त नवभारत टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा दावा आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते तरुण गोगोई यांनी केला आहे. शनिवारी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत तरुण गोगोई यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले की, माझ्या काही सूत्रांनी मला ही माहिती दिली आहे की मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये रंजन गोगोई यांचे नाव आहे. त्यांना कदाचित आसामचे पुढील मुख्यमंत्री म्हणूनही पुढे केले जाऊ शकते. माजी सरन्यायाधीश जर राज्यसभेवर जाऊ शकतात तर ते भाजपकडून मुख्यमंत्री पदाची निवडणूकही लढवू शकतात, असे तरुण गोगोई यांनी यावेळी म्हटले.

तरुण गोगोई पुढे म्हणाले की, हे सगळे राजकारण आहे. भाजप रंजन गोगोई यांच्यावर अयोध्या येथील राम मंदिराच्या निर्णयावरून खूश आहे. अशा वेळी गोगोई हे राज्यसभेच्या मार्गाने राजकारणात प्रवेश करू शकतात. या पदाला ते नाकारू शकत होते. पण त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे त्यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला, असा दावाही तरुण गोगोई यांनी केला आहे.

आपण स्वतः आसामच्या मुख्यमंत्री पदाचा दावेदार नसल्याची तरुण गोगोई यांनी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, मी राज्याचा मुख्यमंत्री बनणार नाही. एका सल्लागाराप्रमाणे मी काम करणे जास्त पसंत करेन. काँग्रेसमध्ये अनेक उमेदवार आहेत, जे ही जबाबदारी घेऊ शकतात, असेही तरुण गोगोई यावेळी म्हणाले.