मध्य प्रदेशातील त्या सायकलस्वार बापाचे आनंद महिंद्रा झाले फॅन; उचलणार मुलाच्या शिक्षणाचा खर्च


सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होणारे महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा हे ट्विटरच्या माध्यमातून अनेकदा अगदी व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या फोटोंपासून सुविचारांपर्यंत अन् वेगवेगळ्या कल्पना मांडत असतात. त्यांनी केलेले ट्विट अनेकदा व्हायरल देखील होतात, हे आपण सर्वांनीच पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेकवेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची मदत देखील केली आहे. तसाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील एका व्यक्तीची आनंद महिंद्रा यांनी मदत केली आहे. लॉकडाउनमध्ये बापाचे कर्तव्य बजावत त्या व्यक्तीने मुलाच्या परीक्षेसाठी तब्बल १०५ किमी सायकल चालवली.

सोशल मीडियावर धारमधील या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे. त्या व्यक्तीच्या कर्तव्याला अनेक नेटकऱ्यांनी सलामही केला आहे. त्या व्यक्तीचे सोशल मीडियावर कौतुक सुरु असताना आनंद मंहिद्रा यांनी कौतुक करत त्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी देखील स्वीकारली. याची माहिती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत दिली. नेटकऱ्यांनी त्यांच्या या निर्णयामुळे आनंद महिंद्रा यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की, मुलाच्या भविष्यासाठी स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी झटणाऱ्या बापाला सलाम. देशाला अशीच स्वप्ने पुढे घेऊन जातात. आशिषच्या पुढील सर्व शिक्षणाचा खर्च आमची संस्था उचलत आहे. या कुटुंबाशी संपर्क करण्यासाठी पत्रकारांची आनंद महिंद्रा यांनी मदत मागितली आहे.

धार जिल्ह्यातील बायडीपुरा येथील राहणारे शोभाराम यांचा मुलगा आशिष दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. जिल्ह्यातील फक्त धार केंद्राची निवड दहावीच्या परीक्षासाठी केली होती. कोरोनामुळे सर्व बस आणि वाहतूक बंद होती. परिणामी मुलाच्या परीक्षेसाठी बापाने १०० किमीपेक्षा जास्त सायकल चालवून मुलाला परीक्षेच्या केंद्रावर पोहचवले. त्यांनी या प्रवासाठी दोन दिवसाचे जेवण घेतले होतं. रात्री मंदिर आणि शाळेत आराम करत ते धार येथे परिक्षेसाठी पोहचले होते.