सर्वात सुपरफास्ट इंटरनेटची नोंद; मोडीत निघाला आधीचा इंटरनेट स्पीडचा विक्रम


संपूर्ण जग एकीकडे कोरोना संकटाशी सामना करत आहे, तर दुसरीकडे कोरोनामुळे ओढावलेले आर्थिक संकट दुर करण्यासाठी सर्वच जगातील नागरिक वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देत आहेत. याचदरम्यान इंटरनेटचा देखील वापर खूप प्रमाणात वाढला आहे. पण काहीवेळा इंटरनेटचा स्पीड कमी असल्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. काहीवेळेस आपल्याकडे असलेले काम वेळेत पूर्ण होत नाही. त्यामुळे काही काहीवेळा आपल्यापैकी अनेकांना इंटरनेटचा स्पीड जास्त असेल तर आपली कामे पटापट होतील, असा विचार येतो. अशाच इंटरनेट युझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सर्वात वेगवान इंटरनेटचा नवा विक्रम युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांनी नोंदवला आहे. १७८ टेराबाईट्स (टीबीपीएस) प्रति सेकंद ऐवढा या इंटरनेटचा स्पीड नोंदवला गेला आहे.

सध्याच्या घडीला आपल्या देशात इंटरनेट किमान स्पीड २ एमबीपीएस ऐवढा आहे. यावरून युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांनी नोंदवलेल्या सर्वात वेगवान इंटरनेटचा अंदाज बांधता येऊ शकेल. इंटरनेट स्पीड मोजणारा प्रकल्प रॉयल अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, एक्सटेरा आणि किड्डी रिचर्सच्या डॉ. लिडिया गाल्डिनो यांनी हाती घेतला होता. याआधी ऑस्ट्रेलियात सर्वाधिक इंटरनेट स्पीडची नोंद करण्यात आली होती. ४४.२ टीबीपीएस ऐवढा त्या इंटरनेटचा स्पीड नोंदवला गेला होता. पण यावेळी नोंदवल्या गेलेल्या इंटरनेटचा स्पीड त्याच्या चारपट आहे.

१७८ टीबीपीएस ऐवढा इंटरनेटचा स्पीड थक्क करणारा आहे. नेटफ्लिक्सवरील सर्वच्या सर्व कंटेट या स्पीडमुळे अवघ्या एका सेकंदात डाऊनलोड केले जाऊ शकते. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांनी इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी जास्त क्षमतेच्या वेव्हलेंथचा वापर केला. सर्वसामान्यपणे इंटरनेटसाठी फायबर ऑप्टिक केबल्सचा वापर होतो. याशिवाय संशोधकांनी नव्या ऍम्प्लिफाईड तंत्रज्ञानाचाही वापर केला.

४.५ टेराहर्ट्झची बँडविड्थ सध्याच्या पायभूत सुविधांमध्ये वापरली जाते. काही मोजक्याच ठिकाणी नवी ९ टेराहर्ट्झची बँडविड्थ वापरली जात आहे. पण १६.८ टेराहर्ट्झची बँडविड्थ हे सुपरफास्ट इंटरनेट वापरते. त्यामुळे इंटरनेटचा वेग १२८ टेराहर्ट्झवर पोहोचतो. या सगळ्यामुळे खर्च मोठ्या प्रमाणात वाढेल, असे अनेकांना वाटू शकेल. पण युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार अॅम्प्लिफायरचा वापर करण्यासाठी येणारा खर्च फायबर ऑप्टिक्स केबलसाठी येणाऱ्या खर्चापेक्षा कमी आहे.