या गणेश मंदिरांना एकदा तरी भेट द्याच


आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असली तरी यंदा कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे.  त्यामुळे यावर्षी गणेशभक्तांची गणेशदर्शनासाठी गर्दी होणार नाही. दरम्यान भारतात व परदेशात अनेक ठिकाणी गणेश मंदिरे आहेत व त्यातील कांही चांगलीच प्रसिद्ध ही आहेत. भारतात प्रत्येक गावांत एक तरी गणेश मंदिर असतेच. ती गावाची ग्रामदेवता मानली जाते. आपल्याला पर्यटनाची विशेष आवड असेल तर देशातील या गणेश मंदिरांना एकदा तरी अवश्य भेट द्या.

उच्ची पिल्लेयार मंदिर रॉकपोर्ट- द.भारतातील हे प्रसिद्ध पहाडी किल्ला मंदिर त्रिची शहरातील मध्यावर असलेल्या पहाडावर आहे. चोल राजवंशियांनी खडक कापून त्यातून हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. पहाडाच्या शिखरावर असल्याने त्याला उच्ची पिल्लीयार म्हणून ओळखले जाते. देशाच्या विविध भागातून लोक या गणेशाच्या दर्शनासाठी येतात.


कनिपक्कम विनायक- आंध्रातील चितूर येथे असलेले हे मंदिर श्रद्धा व चमत्काराचे प्रतीक मानले जाते. या मंदिराच्या अनेक कथा सांगितल्या जातात. ११ व्या शतकात चोल राजा कुलोतांग प्रथम याने हे मंदिर उभारले व १३३६ साली त्याचा विकास केला गेला. तो विजयनगर साम्राज्यकाळ होता. या मंदिराची कहाणी मोठी रोचक आहे. त्यानुसार या गणेशाचा आकार दररोज कणाकणाने वाढतो. तसेच आसपास कुठे लढाई होत असेल तर या गणेशाची प्रार्थना केली की युद्धाचे ढग पांगतात असेही म्हणतात.


मनाकुला विनायक मंदिर- पाँडिचेरीला येणार्‍या पर्यटकांचे हे विनायक मंदिर एक आकर्षण आहे.हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. पाँडिचेरीवर फ्रेंच वसाहतवाद्यांनी कब्जा करण्याअगोदर हे मंदिर अस्तित्त्वात होते. दूरदूरून भक्त या गणेशाच्या दर्शनासाठी येतात.


मधुरमहागणपती- केरळमधील या मंदिराची कहाणीही अतिशय मनोरंजक आहे. पूर्वी हे मूळचे शिवमंदिर होते. असे सांगतात की या मंदिराच्या पुजार्‍याचा मुलगा अगदी लहान होता तेव्हा खेळता खेळता त्याने या मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतीवर गणेशाची प्रतिमा काढली. नंतर या प्रतिमेचा आकार दिवसेनदिवस वाढू लागला व अखेर हे मंदिर गणेशाचे म्हणून ओळखले जाऊ लागले.


गणेश टोक – सिक्कीमची राजधानी गंगटोक येथून नथुला मार्गावर जाताना हे मंदिर लागते.६५०० फूट उंचीवरच्या या मंदिरात भाविकांची सदोदित गर्दी असते. या मंदिरातून सारे गंगटोक एका नजरेत न्याहाळता येते.


मोती डुंगुर गणेश मंदिर हे राजस्थानची राजधानी जयपूरमधील प्रसिद्ध मंदिर आहे. जयपूरवासियांचे हे श्रद्धास्थान. इतिहासकार सांगतात गणेशाची ही प्रतिमा जयपूर नरेश माधोसिंग यांच्या पट्टराणीच्या गावातून आली. १७१६ साली पट्टराणीचे गाव मावली येथे ही प्रतिमा गुजराथेतून आली होती तेव्हाच ती ५०० वर्षे जुनी होती. नगरशेठ पल्लीवाल ही मूर्ती घेऊन आले होते. त्यावरच हे मोती डुंगुर गणेश मंदिर बांधले गेले आहे.

Leave a Comment