चीनला आणखी एक दणका, रेल्वेने रद्द केले 44 ‘वंदे भारत’ ट्रेन्सचे टेंडर

लडाखमधील चीनसोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत चीनवर आर्थिक बाजूने एकामागोमाग एक कारवाया करत आहे. भारताने 44 सेमी हाय स्पीड वंदे भारत ट्रेन्सच्या निर्मितीचे टेंडर रद्द केले आहे. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, एका आठवड्यात नवीन टेंडर जारी केले जाईल व केंद्राच्या मेक इन इंडिया अभियानाला प्रोत्साहन दिले जाईल.

सरकारकडून टेंडर रद्द करण्याचे हे पाऊल चीनसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. कारण 44 या ट्रेनच्या निर्मितीसाठी 6 प्रबळ दावेदारांमध्ये चीनची सीआरआरसी पायोनिर इलेक्ट्रिक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ही एकमेव परदेशी कंपनी होती. रेल्वेने या संदर्भात ट्विट करत देखील माहिती दिली.

पीटीआयनुसार, एखाद्या स्थानिक कंपनीला हे टेंडर मिळावे हे रेल्वेकडून सुनिश्चित केले जात आहे. चीनी कंपनी या टेंडर मिळवण्याच्या स्पर्धेत सर्वात पुढे असल्याचे लक्षात येताच, टेंडरच रद्द करण्यात आले.

10 जुलै रोजी चेन्नई येथील भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीने टेंडर काढले होते. रेल्वे मंत्रालयाच्यानुसार, चीनच्या कंपनी व्यतिरिक्त भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, भारत इंडस्ट्रीज, इलेक्ट्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, मेधा सर्व्हो ड्राइव्हस प्रायव्हेट लिमिटेड आणि पॉवरनेटिक्स इक्विपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या  कंपन्या बोली लावणार होत्या.