गणपती बाप्पा मोरया


आज गणपतींचे आगमन होत आहे. आता महाराष्ट्रात दहा दिवस गणपती महोत्सव साजरा होईल. या उत्सवात काय काय होत असते आणि काय काय नाही याची चर्चाही याच दहा दिवसात होईल. बघता बघता हा उत्सव फार बदलूून गेला. हा बदल टिळकांच्या काळातल्या गणपतीशी तुलना करता बदललेला नाही तर हा बदल ेगेल्या १५ ते २० वर्षातला आहे. विशेषत: मुक्त अर्थव्यवस्था आल्पापासून हा बदल जाणवायला लागला आहे. अर्थात या बदलाच्या सर्वच पैलूंशी या मुक्त अर्थव्यवस्थेचा काही संबंध आहेच असे काही नाही. काही पैलूंशी नक्कीच आहे. बदलत्या राजकारणाशीही आहे. गेल्या पन्नास वर्षात एक चर्चा होत होती की. गणेशोत्सव हा करमणूक प्रधान होत आहे. उत्सव म्हटले की, लोक एकत्र येणे हे आलेच. लोक एकत्र आले की सामाजिक आणि राजकीय विषयावर व्याख्यानच ठोकले पाहिजे आणि तशी व्याख्याने झाली तरच तो उत्सव बौद्धीक होतो असेही काही नाही. शेवटी समाजात व्याख्याने ऐकणारांचे प्रमाण असते तरी किती? पाच ते दहा टक्के लोकांनाही ती असत नाही. शिवाय या अल्पसंख्यकांना भाषणे ऐकायला वेळही मिळायला हवा.

म्हणून टिळकांनंतरच्या गणेशोत्सवात व्याख्यानांकडून लोक कलाविष्काराकडे वळले. त्यालाही एक सामाजिक महत्त्व आहे कारण समाजात अनेकांकडे अनेक प्रकारचे कसब असते. त्याला आपले कसब लोकांसमोर आले पाहिजे आणि समाजाने आपल्याला त्या संदर्भात ओळखले पाहिजे असे वाटत असते. आपल्याकडे छान रांगोळ्या काढण्याची कला आहे पण समाज आपल्याला तसे ओळखत नाही अशावेळी ते कसब बाळगणाराला असमाधान वाटत असते. उत्सवात त्याला आपले कसब दाखवता आले, ते मर्यादित क्षेत्रातल्या लोकांनी पाहिले, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली की त्या व्यक्तीला समाधान लाभते. अशा लोकांना समाजात मान्यता मिळणे हाही उत्सवाचा चांगला हेतू असू शकतो. त्याला उगाच व्याख्यानाच्या तुलनेत कमी लेखण्याचे काही काम नाही. गणेशोत्सवात झालेला हा बदल काही वाईट नाही. पण अलीकडे या उत्सवात झालेले बदल काहींच्या काहीच आहेत. त्यात कार्यकर्त्याला कसला त्रासच नाही. कलेचा आविष्कार घडवायचा झाला तरीही त्यासाठी व्यावसायिक कलाकारांना वापरले जाते आणि पैसे देऊन त्याची कला विकत घेतली जाते. मडळाच्या कार्यकर्त्याला केवळ वर्गणी वसूल करणे आणि रांगा लावणे एवढेच काम उरले आहे. त्याच्या कलागुणाला वावच मिळत नाही. मात्र एकवेळ हाही बदल परवडला असे इतर काही वाईट बदल या उत्सवात झाले आहेत.

वर्गणी वसुलीचा दणका हा प्रकार आता तुलनेने कमी झाला आहे. कारण आता मंडळांना त्यासाठी फार आटापिटा करावा लागत नाही. पुढारी आणि कोणताही कार्यक्रम प्रायोजित करण्यास आतुर असलेल्या संस्था, संघटना आणि कंपन्या या त्यांच्या मागे उभ्याच असतात. त्यांचे त्यात काही नुकसान होत नाही. उलट आपली कंपनी आणि संस्था यांना लोकांसमोर मोठी प्रसिद्धी मिळत असल्याने त्या संस्था खुषच असतात. तेव्हा आता दुकानदार आणि व्यापारी यांना दमदाटी देत फिरूऩ पैसा गोळा करण्याचा मंडळांचा त्रास कमी झाला आहे. हा बदल मुक्त अर्थव्यवस्थेने घडवून आणला आहे. मडळांना पैशाचा पुरवठा करणारा दुसरा एक घटक आता लक्षात आला आहे. तो म्हणजे पुढारी. पुढार्‍यांना आता निवडणुकीत पैसा खर्च करणे फार अवघड झाले आहे. टी. एन. शेषन यांनी हे उपकार केले आहेत. त्यांनी निवडणूक आचार संहितेचा बडगा फार प्रभावीपणाने उगारायला सुरूवात केली आहे. त्यांच्यानंतरच्या निवडणूक आयुक्तांनी पुढे जाऊन एवढी बंधने आणली आहेत की निवडणुकीत पैसा खर्च करण्याची गरज असताना आणि तशी पुढार्‍यांची ऐपत वाढली असतानाही त्यांना पैशाचा खर्च आवरावा लागत आहे. ही स्थिती गणेशोत्सव मंडळांच्या पथ्यावर पडली आहे.

ऐन निवडणुकीत पैसे खर्चता येत नसले तरी हाच पैसा आपल्या भागातल्या तरुण कार्यकत्यार्ंंना आगावूच देण्याचे एक निमित्त म्हणजे दहीहंडी आणि गणेशोत्सव. या निमित्ताने कितीही रुपये दिले तरीही नेत्यांना कोणाचे बंधन येत नाही. आणि एकदा कोणत्या का निमित्ताने होईना पण कार्यकर्त्यांना पैसा दिला की त्या बदल्यात त्यांना निवडणुकीत वापरता येते. म्हणून नेत्यांनी गणेशोत्सवाला सढळ हातांनी मदत करायला सुरूवात केली आहे. किंबहुना या लोकांची ती गरजच झाली आहे आणि सोयही झाली आहे. त्यांच्याकडून असा पैसा काढता येतो म्हणून काही मंडळे त्यासाठी म्हणून स्थापन झाली आहेत. गणेशोत्सवात मंडळाच्या मंडपात आता जुगार सुरू झाला आहे आणि मंडळांनी आपल्या मंडपातले टेबल त्यासाठी भाड्याने देऊन त्यातूनही पैसा गोळा करायला सुरूवात केली आहे. मंडळाने एखाद्या देवाच्या देवळाचा देखावा उभा केला तर तो बघायला गर्दी होत आहे आणि ही गर्दी देवासमोर पैसेही टाकायला लागली आहे. गणपतीच्या मूर्तीची पूजा रोज एका मान्यवराच्या हस्ते केली जाते. त्याही मानाचा लिलाव करून त्यातूनही काही मंडळे पैसा कमावत आहेत. हा तसा जुलमाचा रामराम असतो पण लोक प्रतिष्ठा मिळावी म्हणून तोही करीत आहेत आणि त्यापोटी मंडळांना हजारो रुपये द्यायला लागले आहेत. एकंदरीत गणेशोत्सव बदलला आहे.

Leave a Comment