गणपतीला का वाहतात दुर्वा ?


रिद्धीसिद्धीची देवता असलेल्या गणेशाच्या पूजेत दुर्वांचा समावेश असतो. गणेशाला या दुर्वा फार प्रिय असल्याचे अनेक कथा सांगतात. गणेशाला लाल फूल जसे वाहिले जाते तसेच दुर्वांची जुडीही अवश्य वाहिली जाते त्यामागचे कारण मात्र आपल्याला बरेच वेळा माहिती नसते.

दुर्वा वाहण्यामागे एक प्राचीन कथा सांगितली जाते ती अशी. अनलासूर नावाच्या राक्षसाने स्वर्ग आणि धरतीवर उच्छाद मांडला होता. देवांना आणि सर्वसामान्य नागरिकांना तो अतिशय त्रास देत होता आणि जिवंतपणीच गिळून टाकत होता. त्याने सर्व जगाला त्राही भगवान करून सोडले होते. त्याच्या अधिपत्यासाठी देवांनी महादेवाकडे गार्हागणे घातले. मात्र महादेवांनीही या राक्षसाचा निःपात करण्यास असमर्थता दर्शविली. कारण या राक्षसाला मारायचे तर त्याला जिवंत गिळणेच भाग होते. महादेवांनी हे काम एकटा लंबोदर गणेशच करू शकेल असे देवांना सांगितले. देवांनी मग गणेशाची प्रार्थना केली तेव्हा त्याने अनलासूरला गिळून टाकण्याची तयारी दर्शविली आणि खरोखरच त्याला गिळले.

यामुळे देवदेवादिकांचा त्रास संपला पण राक्षसाला गिळल्यामुळे गणेशाच्या पोटात मात्र प्रचंड आग सुरू झाली. अनेक उपाय करूनही ती थांबेना. अखेर कश्यप ऋषींनी गणेशाला दुर्वांचा रस प्यावयास सांगितले. तो प्राशन केल्यावर मात्र ही आग थंड झाली. तेव्हापासून गणेशाला दुर्वा प्रिय झाल्या.

दुर्वा हे एकप्रकारचे गवत आहे मात्र त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्या शरीराला शांत करणार्‍या, रेचक आहेतच पण दुर्वांच्या रसात शक्ती प्रदान करण्याती ताकद आहे. पशुंना त्या खायला दिल्या तर त्यांना पुष्टी मिळते शिवाय त्यांच्या दुधात वाढ होते. दुर्वां असलेल्या जमीनीवर अनवाणी पायांनी पहाटे चालल्यास डोळे तेजस्वी होतात. तसेच रक्तदाब ही नियंत्रणात राहतो.

संख्याशास्त्रानुसार दुर्वा याचा अर्थच प्राण किवा जीव असा आहे. त्या पवित्रतेचे प्रतीक आहेत. दुर्वा अनेक मुळांतून उगवतात. दोन पानी दुर्वा माणसाच्या सुखदुःखाचे द्वंद परमात्म्याकडे पोहोचवितात. तीन पानी दुर्वा यज्ञात वापरल्या जातात कारण त्या भौतिक, कर्म आणि माया यांचे प्रतीक असून मनुष्यातील या तिन्ही दोषांचे यज्ञात दुर्वा भस्म केल्यामुळे भस्म होते अशी समजूत आहे. पाचपानी दुर्वा या पंचप्राण स्वरूप आहेत. गणेशाला या तिन्ही प्रकारच्या दुर्वा जुडीच्या स्वरूपात वाहिल्या जातात. याशिवाय पांढर्‍या दुर्वाही गणेशाला आवर्जून वाहिल्या जातात.

Leave a Comment