अग्रपूजेचा मानकरी गणेश


आज भाद्रपद शुल्क चतुर्थी म्हणजे गणांचा अधिपती गणेशाचा स्थापना दिवस. देशभर आजचा दिवस गणेशोत्सवाचा दिवस असून जागोजागी, घराघरातून गणेश मूर्तीची स्थापना केली जाईल. कुठे दीडदिवसांत, कुठे पाचव्या, कुठे सातव्या तर कुठे दहा दिवसांचा मुक्काम ठेवून बाप्पांना हृद्य निरोप दिला जाईल व पुनरागमनायच म्हणून त्यांची बोळवणी केली जाईल. हिंदू संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्यात प्रथम पुजेचा मान हा या विघ्नहर्त्याला दिला गेला आहे. यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. त्यातील कांही कथांचा हा मागोवा

गणेशाला प्रथम पूजेचा मान देण्यामागची एक कथा शिवपुराणात सांगितली गेली आहे. त्यानुसार सर्व देवीदेवतांत श्रेष्ठ कोण याची चर्चा सुरू झाली व तेव्हा सर्वांनी तेच श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन करायला सुरवात केली. वादाने वाद वाढला व त्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी सर्व देव शिवाकडे म्हणजे देवांचा देव महादेवाकडे आले. तेव्हा शिवाने सर्वांना पृथ्वीला तीन प्रदक्षिणा घालायला सांगितल्या. जो प्रथम येईल तो श्रेष्ठ असा तोडगा काढला. सर्व देव पृथ्वीप्रदक्षिणेसाठी बाहेर पडले तेव्हा गणेशाने मात्र माता पिता म्हणजे शिवपार्वतीलाच तीन प्रदक्षिणा घातल्या. त्याच्या या चातुर्यावर खूष झालेल्या शिवाने त्याला विजयी घोषित केले व देवांत अग्रपुजेचा मान दिला.


दुसर्‍या कथेनुसार गणेश ब्रह्म जाणणारा आहे म्हणून तो अग्रपुजेचा मानकरी आहे. गणेशाचे एक नांव आहे भालचंद्र. म्हणजे चंद्राला माथ्यावर धारण करणारा. चंद्राचे तेज निर्मळ व शीतल असते. असा चंद्र मस्तकावर धारण करणे म्हणजे मस्तक जितके शांत राहते तितकी आपल्यावर सोपविली गेलेली कार्ये अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडण्याची कुवत वाढणे. गणांच्या गणपतीने चंद्र धारण करून जीवनांत शांत राहण्याचा संदेश दिला आहे. शांत राहणे याचाच अर्थ स्वतःवर नियंत्रण ठेवणे. अशी व्यक्ती आयुष्यातल्या प्रत्येक युद्दात विजयाची धनी होते. गणेश विजयाची देवता म्हणून तो अग्रपुजेचा मानकरी.

याचा आणखी एक अर्थ असा की चंद्र म्हणजे ब्रह्मदेव. तो ब्रह्माला अधिक जाणतो. मस्तकावर चंद्र म्हणजे गणेश ब्रह्म जाणणारा म्हणजेच सर्वज्ञ म्हणून तो पहिल्या पूजेचा मानकरी आहे.

Leave a Comment