केंद्र सरकारच्या ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप’ स्पर्धेत ‘या’ स्टार्टअपने मारली बाजी


नवी दिल्ली – केरळच्या टेकजेनसिया सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडने (अलाप्पुझा) केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सुरक्षित ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप’ डेव्हलप करण्याच्या स्पर्धेत बाजी मारली असून या स्पर्धेच्या विजेत्याची घोषणा गुरूवारी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली. एक कोटी रुपये विजेत्याला प्रोडक्टसाठी दिले जाणार आहेत. त्याचबरोबर प्रोडक्टच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पुढील तीन वर्षांपर्यंत अतिरिक्त 10 लाख रुपये दिले जाणार आहेत.

12 एप्रिल रोजी सुरक्षित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म डेव्हलप करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या स्पर्धेची घोषणा केली होती. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला व जवळपास १९८३ अर्ज आले होते. त्यापैकी जुलैमध्ये मंत्रालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म डेव्हलप करण्यासाठी फक्त – पीपललिंक युनिफाईड कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (हैदराबाद), सर्व वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड (जयपूर), टेकजेनसिया सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (अलाप्पुझा), इन्ट्रिव्ह सॉफ्टलॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड (चेन्नई) आणि साउलपेज आयटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (हैदराबाद) या पाच कंपन्यांची निवड केली होती. या पाचपैकी टॉप तीन स्टार्टअप्सना प्रत्येकी २० लाख रुपये, तर अन्य दोन स्टार्टअप्सना प्रत्येकी १५ लाख रुपये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप डेव्हलप करण्यासाठी देण्यात आले होते.

आता त्यातील केरळच्या टेकजेनसिया सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडला विजेता घोषित करण्यात आले आहे. याशिवाय सर्व वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड (जयपूर), पीपललिंक युनिफाईड कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (हैदराबाद) आणि इन्ट्रिव्ह सॉफ्टलॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड (चेन्नई) या तीन स्टार्टअप्सनाही प्रत्येकी 25 लाख रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे त्यांनी डेव्हलप केलेल्या प्रोडक्टमध्ये अजून योग्य सुधारणा करण्यासाठी दिले जाणार आहेत. तर, विजेता ठरलेल्या टेकजेनसियाला एक कोटी रुपये प्रोडक्टसाठी दिले जाणार आहेत. तसेच प्रोडक्टच्या देखभाल-दुरुस्तीसाठी अतिरिक्त 10 लाख रुपये पुढील तीन वर्षांपर्यंत दिले जातील.