यालाच म्हणतात डोळ्यात धूळ फेकणे; स्वदेशी कंपन्याच विकत आहेत Made in PRC असलेली चिनी उत्पादने


नवी दिल्ली – लडाखच्या गलवाण खोऱ्यात भारतीय लष्कराच्या जवानांवर चीनच्या सैन्याने पाठीमागून वार केला होता. त्यावेळी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले होते. तर भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात चीनचे 40 हून अधिक सैनिक मारले गेले होते. या चीनच्या दुट्टपी भूमिकेमुळेच भारतीयांमध्ये सध्या संतापाची लाट आहे. त्यामुळेच देशभरात चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली असून चिनी कंपन्यांवर बंदी, कंत्राटे रद्द करण्याची कारवाई केंद्र सरकारनेही केली आहे. यामुळे भारतीय Made In China ची उत्पादने खरेदी करणे टाळू लागले आहेत. यावर काही कंपन्यांनी मोठी शक्कल लढविली आहे.

भारतीयांसोबत घोर फसवणूक करण्यास स्वत:ला भारतीय म्हणवणारी कंपनी Boat या हेडफोन आदी बनविणाऱ्या कंपनीने सुरुवात केली आहे. ज्या वस्तू चीनमधून आयात केल्या जातात त्यावर मेड इन चायना असे लिहिलेले असते. पण त्या जागी आता Made in PRC लिहिले जात आहे. या कंपन्या अशाप्रकारे भारतीयांच्या भावनांशी खेळू लागल्या आहेत. याचदरम्यान तुमच्या माहितीसाठी यापूर्वी मेड इन युएसए असे अनेक उत्पादनांवर लिहिलेले असायचे. परंतू ते अमेरिकेचे नसून उल्हासनगर असायचे. या कंपन्या असाच काहीसा भ्रम ग्राहकांमध्ये उत्पन्न करू लागल्या आहेत. P.R.C चा नेमका अर्थ People’s Republic of China असा होतो. ही मेड इन चायना लिहिण्याची वेगळी पद्धत असून भारतीयांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकल्याने या कंपन्यांनी आता Made in P.R.C असे लिहून भारतीयांच्या गळ्यात चिनी उत्पादने बांधण्याचा बाजार सुरु केला आहे.

एका ग्राहकाने यावर ट्विट करून कंपनीच्या @BoatNirvana या ट्विटर हँडलवर जाब विचारला आहे. भारतीयांना मूर्ख बनविता का? असा सवालही केला आहे. यावर या कंपनीने केलेली सारवासारव हास्यास्पद आहे. यावर कंपनीने चीन आमच्या व्हॅल्यू चेनचा महत्वाचा भाग आहे. आम्ही 100 टक्के भारतीय आहोत. भारतातच नोकऱ्या देतो आणि दुसऱ्या कंपन्यांसारखे चीनला पैसे पाठवत नसल्याचे उत्तर दिले आहे.