नवरा भांडतच नसल्यामुळे महिलेने मागितला घटस्फोट


लखनऊ – संसार म्हटल्यावर भांड्याला भांडे आपटतेच, त्याचबरोबर संसारात नवरा बायकोची तू-तू-मैं-मैं ही नित्य नियमाने ठरलेली असते. पण हा वाद ऐवढा टोकाला पोहचतो, की तो न्यायालयापर्यंत जाऊन पोहचतो. याला काही जोडपीच अपवाद ठरतात. पण आता आम्ही तुम्हाला एक अशी बातमी सांगणार आहोत, ज्यावर तुमचा शक्यतो विश्वास बसणार नाही. कारण असे क्वचितच घडू शकते. ही बातमी उत्तर प्रदेशातील आहे. जेथील एका बायकोने आपल्या नवऱ्याकडे चक्क भांडत नसल्यामुळे घटस्फोट मागितला आहे. यासर्वात विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या लग्नाला केवळ १८ महिनेच झाले आहेत.

ही घटना उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यात घडली आहे. घटस्फोटासाठी या महिलेने शरिया कोर्टात अर्ज दाखल केला होता. शरिया कोर्टाने अर्ज दाखल केल्यानंतर घटस्फोटामागील कारण जाणून घेतल्यानंतर ते ऐकून मौलवीही चक्रावून गेले. त्यानंतर महिलेची मागणी निर्थरक असल्याचे सांगत मौलवींनी अर्ज फेटाळून लावला. या संदर्भातील वृत्त दैनिक जागरणने दिले आहे.

या याचिकेवर निर्णय घेण्यास जेव्हा मौलवीने नकार दिला, तेव्हा हे प्रकरण स्थानिक पंचायतीकडे गेले. या प्रकरणावर निर्णय घेण्यास त्यांनीही असमर्थता दर्शवली. आपल्या नवऱ्याचे आपल्यावर असलेले प्रेम आपण सहन करू शकत नाही. तो कधीही माझ्यावर ओरडत नाही. मला कोणत्याही गोष्टीसाठी नकार देत नाही. कधी कधी माझ्यासाठी जेवण ही बनवतो आणि घरकामात मदत देखील करतो. त्याचबरोबर तो माझ्याशी कधीही भांडण करत नसल्याची तक्रार या महिलेन शरिया कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केली होती.

त्याचबरोबर या महिलेने असे देखील सांगितले की, कोणतीही चूक माझ्य़ाकडून झाली तरी तो माझ्यावर ओरडत नाही. पती नेहमी मला माफ करुन टाकतो. त्याच्याशी मला भांडण करायचे असल्यामुळे मला असे आयुष्य नको आहे की जिथे पती प्रत्येक गोष्टीसाठी सहमत असेल, अशी तक्रार महिलेने केली आहे. दरम्यान, महिलेच्या पतीने पत्नीला नेहमी आनंदी ठेवण्याची इच्छा असल्याचे असे सांगितले. त्याने तिला कोर्टातून घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. कोर्टाने आता दोघांना परस्पर सहमतीने हा प्रश्न सोडवण्यास सांगितले आहे.