मंदाकिनी मंदिरात आहे एकमेव गणेशी मूर्ती


भिलवाडा जिल्ह्यातील बिजोली या गावी असलेले मंदाकिनी मंदिर असे मंदिर आहे जेथे स्त्रीरूपातील गणेशाची मूर्ती – गणेशीची मूर्ती पहायला मिळते. या मंदिराची ख्याती दूरवर पसरलेली असून या अर्धनारी गणेशाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात.भक्तांच्या दुःखाचा परिहार करणारी आणि मनोकामना पूर्ण करणारी ही मूर्ती प्राचीन आहे.

हे मंदिर सुमारे ८०० वर्षे जुने असून स्कंद पुराणात लंबोदराने स्त्री रूपात पृथ्वीवर अवतार घेतल्याचे उल्लेख आहेत , त्यानुसार येथील मूर्ती बनविली गेली आहे. अशा दोन मूर्ती या मंदिरात आहेत. १० व्या शतकापासून त्यांची पूजा केली जात आहे. या मूर्तीच्या एका हातात मोदक तर दुसर्‍या हातात महिलांचे दागिने आहेत. वास्तविक हे मंदिर शंकरासाठी बांधले गेले होते. अर्धनारीनटेश्वराची स्थापना येथे केली जाणार होती. मात्र नंतर तेथे स्त्रीरूपातील गणेशाची स्थापना केली गेली असे इतिहास सांगतो.

अंधकासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर आतंक माजविला होता. त्याच्या नाशासाठी देवांनी शंकराची प्रार्थना केली. त्यावेळी शिवाने त्याला ठार केले व त्याचे रक्त पिण्यासाठी २०० माता उत्पन्न केल्या. त्यातील एक नारी गणेश रूपात असल्याचेही सांगितले जाते. १३ व्या शतकातले हे मंदिर शिल्पकारांनी अतिशय कुशलतेने सजविले आहे. या मंदिरात गणेशचतुर्थीच्या दिवशी येऊन पूजा करणार्‍या भाविकास आयुष्यात कधीच अडचणी येत नाहीत आणि त्याची मनोकामना पूर्ण होते असा समज आहे. तसेच  येणार्‍या गणेशचतुर्थीचे येथे अधिक महत्त्व असून या योगावर या मंदिरात लक्षावधींच्या संख्येने भाविक येतात असेही समजते.

Leave a Comment