मोदी सरकार ‘यांना’ देणार कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्यामुळे देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. तर या दुष्ट संकटातून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत, तर दुसरी देशातील शास्त्रज्ञ या रोगाचा मूळासकट नायनाट व्हावा अशा लसीचे संशोधन करण्यात व्यस्त आहेत. याचदरम्यान कारोना प्रतिबंधक लस खरेदी करण्याचा विचार केंद्रातील मोदी सरकार करत असून पहिल्या टप्प्यात ५० लाख डोस खरेदी करण्यासंबंधी चर्चा सुरु आहे. कोरोना प्रतिंधक लस मिळण्याचा पहिला मान केंद्र सरकारकडून कोरोना योद्धा, भारतीय सैन्य आणि विशिष्ट श्रेणीतील लोकांना दिला जाण्याची शक्यता आहे.

लसीचा पुरवठा साखळी आणि वितरणावर केंद्र सरकारचे संपूर्ण लक्ष असून मोठ्या प्रमाणात लसीचे वितरण करण्याची योजना केंद्र सरकार आखत आहे. जेणेकरुन कोरोना प्रतिबंधक लस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, त्याचबरोबर या वर्षाअखेर किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे.

कोरोना लस विकसित करणाऱ्या कंपन्यांसोबत सोमवारी झालेल्या बैठकीत नीती आयोग सदस्य व्ही के पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या ग्रुपने कंपन्यांना कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती, किंमत तसेच सरकार त्यासाठी कसा पाठिंबा देऊ शकते यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितलं आहे.

स्वातंत्र्य दिनाला देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीचा उल्लेख केला होता. सध्याच्या घडीला देशात एक नाही तर तीन कोरोना लसींची चाचणी सुरु असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले होते. भारतात सध्या तीन कंपन्या करोनावरील लसीवर काम करत आहेत. या कंपन्या मानवी चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आहेत. तिसरा टप्पा पार पाडण्यासाठी बराच अवधी असून ती पार पडल्यानंतर लस उपलब्ध होईल, असे सांगितले जात आहे.