देशातील सर्वात अस्वच्छ शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये बिहारमधील सहा शहरांचा समावेश


नवी दिल्ली – महाराष्ट्राने या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत देशात सर्वाधिक चार, तर अन्य विभागांतील १३ असे एकूण १७ पुरस्कार मिळवून ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे. महाराष्ट्राला मोठय़ा राज्यांच्या मानांकनात दुसरा क्रमांक मिळाला असून, सर्वाधिक स्वच्छ शहराचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नवी मुंबईला, तर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहराने मिळविला आहे.

पण सर्वाधिक अस्वच्छ शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये सहा शहरे बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे. बिहारमधील सहा शहरांचा १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या सर्वात अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये समावेश आहे. पहिल्या दोन्ही स्थानांबरोबरच चौथ्या, पाचव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर बिहारमधील शहरांचा समावेश आहे.

बिहारमधील गया शहर सर्वात अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी बक्सर शहर आहे. त्याचबरोबर १० लाख लोकसंख्या असणाऱ्या सर्वाधिक अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये पाटण्याचा पहिला क्रमांक आहे. तसेच महाराष्ट्रातील एकही शहराचा अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये अव्वल दहामध्ये समावेश नाही

सर्वात अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये पंजाबमधील अबोहार शहर तिसऱ्या स्थानी आहे. अव्वल पाचमध्ये हे एकमेव शहर आहे जे बिहार बाहेरील आहे. चौथ्या स्थानी बिहारमधील भागलपूर शहर आहे. अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये अव्वल पाचपैकी चार शहरे ही बिहारमधील आहेत. पाचव्या स्थानी परसा बाजार असून हे शहर बिहारमध्ये आहे. मेघालयमधील शिलाँग शहर अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये सहाव्या स्थानी आहे. अरुणाचल प्रदेशमधील इटानगर हे या यादीमध्ये सातव्या स्थानी आहे. तर आठव्या स्थानी नागालँण्डमधील दिमापूर एमसी हे शहर आहे. बिहारमधीलच बिहार शरीफ शहर नवव्या स्थानी आहे. १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये बिहारमधील साहारसा हे शहर दहाव्या स्थानी आहे.