३ सप्टेंबरपासून रस्त्यावर धावणार पुण्याची ‘लाईफलाईन’


पुणे : पीएमपीएमएलची बससेवा गणेशोत्सवाच्या कालावधीत होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी, गणेशोत्सवानंतर म्हणजेच ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. पण पहिल्या टप्प्यात २५ टक्केच बसेस १९० मार्गांवर धावणार आहेत.

राज्य सरकारच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत शहरात १ जूनपासून नागरिकांची वर्दळ वाढली. पण ज्यांच्याकडे खाजगी वाहने नाहीत अशा नागरिकांची गैरसोय होत असल्याने, बससेवा सुरू करण्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या दालनात गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गणेशोत्सवामध्येच बससेवा सुरू करण्याबाबत काहींनी मागणी केली. पण गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळावी याकरिता ३ सप्टेंबरपासूनच बससेवा सुरू करावी अशी भूमिका प्रशासनाने मांडली.

महामंडळाकडील एकूण १३ डेपोच्या १९० मार्गांवर ४२१ बसेसचे संचालनाचे नियोजन ३ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या बसेसवेत आहे. पीएमपीएमएल शटल सेवा शहरातील प्रमुख रस्ते उपनगरे येथे गर्दीच्या वेळी सकाळ/सायंकाळी सुरू करण्यात येणार असून, यामध्ये अधिक गर्दीच्या मार्गांना प्राधान्य दिले गेले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आसन क्षमतेच्या ५०% प्रवाशांनाच सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच बसेसमध्ये सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी सीटवर मार्कींग पेटींग करण्यात आलेले आहे. तसेच महत्वाचे स्थानकावर वर्तुळ पेंट करण्याचे काम सध्या सुरू आहे.