20 मिनिटात 500 किमी; बाजारात येणार सर्वात वेगाने चार्ज होणारी इलेक्ट्रिक कार

जगभरात इलेक्ट्रिक कार्सची लोकप्रियता वाढत आहे. आधी चार्जिंगच्या समस्येमुळे लोक याकडे दुर्लक्ष करत होते. मात्र आता सुपरफास्ट चार्ज होणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स बाजारात येत आहेत. लूसिड एअर अशीच एक इलेक्ट्रिक सेडान कार असून, जी वेगवान चार्जिंगचे फीचर देते. इलेक्ट्रिक व्हिकल स्टार्टअप कंपनी लूसिड मोटर्सनुसार ही कार अवघ्या 20 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 500 किमी अंतर पार करू शकते. कंपनी केवळ फास्ट चार्जिंगच नाही तर सर्वाधिक रेंज देण्याचा देखील दावा करत आहे.

लूसिड मोटर्स ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील कंपनी आहे. कंपनीचा दावा आहे की लूसिड एअरची रेंज 832 किमी आहे. कंपनी 2021 मध्ये या इलेक्ट्रिक कारची विक्री करू शकते. कंपनीच्या वेबसाईटनुसार कॅलिफोर्नियाच्या 170व्या स्थापना दिनानिमित्ताने येत्या 9 सप्टेंबरला कंपनी कारला सादर करेल.

Image Credited – The Financial Express

या एअर सेडान कारमध्ये कथितरित्या 830 किमीपेक्षा अधिक ड्रायव्हिंग रेंज असेल.  या कारचे वैशिष्ट्य सुपर फास्ट चार्जिंग आहे. कारची चार्जिंग संपल्यानंतरही काही मिनिटात पुन्हा चार्ज करून पुन्हा चालवता येते. लूसिड एअरमध्ये 300kw पॉवर मोटर मिळू शकते. सध्या बहुतांश इलेक्ट्रिक व्हिकल्समध्ये 270 kw पर्यंतची पॉवर मोटर मिळते. टेस्लाच्या सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय कार मॉडेल 3 मध्ये 250 kw का मोटर मिळते. ही कार ऑटोनॉमस ड्रायव्हिंगसाठी देखील तयार आहे. कंपनीचा दावा आहे की कार अवघ्या 2.5 सेकंदात ताशी 100 किमीचा वेग पकडते.

Image Credited – CleanTechnica

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर रॉलिंसन यांनी सांगितले की, या कारची किंमत 1 लाख डॉलर (जवळपास 75 लाख रुपये) असेल. या इलेक्ट्रिक कारचे कमी किंमत असणारे व्हर्जन देखील नंतर लाँच होतील. लूसिड एअरनंतर कंपनी वर्ष 2023 च्या सुरुवातीला एक एसयूव्ही बाजारात आणणार असून, ती देखील याच प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल.