‘आम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही’, राजकीय वादानंतर फेसबुकने दिले स्पष्टीकरण

द वॉल स्ट्रीट जर्नलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकच्या धोरणाबद्दल धक्कादायक खुलासा करत, द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टवर फेसबुकने भाजप नेते आणि त्यांच्याशी संबंधित काही ग्रुपबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचा दावा केला होता. या प्रकरणावरून भारतात चांगलेच राजकारण तापले होते. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर भाजप-आरएसएसच्या नियंत्रणात असल्याचा आरोप केला होता. आता या वादावर फेसबुकने स्पष्टीकरण दिले आहे.

फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले की, फेसबुक नेहमीच एक खुला आणि पारदर्शक मंच आहे. फेसबुक कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही. या मंचावर लोकांना आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. मोहन म्हणाले की, काही दिवसांमध्ये आमच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. खासकरून हेट स्पीचबाबत आमच्या धोरणांबाबत अनेक आरोप करण्यात आले. आमच्या प्लॅटफॉर्मवर हेट स्पीचला कोणतेही स्थान नाही. सामग्रीबाबत आमचा एक निष्पक्ष दृष्टीकोण आहे व हे आमच्या कम्युनिटी स्टँडर्डद्वारे संचालित होते.

मोहन म्हणाले की, आम्ही हे धोरण संपुर्ण जगात लागू करतो. यात कोणतीही राजकीय स्थिती, विचारधारा आणि धार्मिक-सांस्कृतिक विश्वासाची काळजी करत नाही. आम्ही भारतातील त्या नेत्यांच्या पोस्ट हटवल्या आहेत, ज्या आमच्या कम्युनिटी स्टँडर्डसचे उल्लंघन करतात. पुढे देखील अशा प्रकारची सामग्री हटवली जाईल.

दरम्यान, या प्रकरणात माहिती तंत्रज्ञानाविषयी संसदेच्या स्थायी समितीने फेसबुकला 2 सप्टेंबर रोजी समन्स बजावले आहे. यावेळी, फेसबुक अधिकारी आपले मत मांडतील. या समितीचे अध्यक्ष हे कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर आहेत.