मनसे नेत्याची मागणी; आता तरी बंद करा कोरोनाची ‘ती’ कॉलर ट्यून


मुंबई – इतरवेळी कोणालाही फोन केल्यानंतर समोरच्या आपल्या कानी गाणे अथवा रिंग पडत होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर फोनच्या कॉलरट्यूनवर कोरोनासंदर्भात जनजागृती करणारा संदेश ऐकू येऊ लागला. हा जनजागृती करणारा हा संदेश अद्यापही आपल्या कानी पडत आहे. पण, एखाद्याला संपर्क साधण्यासाठी अनेकदा जास्त वेळ लागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी कोरोनासंदर्भातील कॉलर ट्यूनबद्दलचा हाच मुद्दा उपस्थित करत आता तरी ही कॉलर ट्यून बंद करा अशी, मागणी त्यांनी केली आहे.

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकार, आरोग्य यंत्रणेकडून जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासंदर्भातील माहिती सार्वजनिक ठिकाणी जाहिराती, मेट्रो, लोकलमध्येही प्रसारित करण्यात येत आहे. त्याचबरोबर दूरसंचार विभागानेही कॉलर ट्यूनवरून कोरोनाबद्दल जनजागृती सुरू केली होती. ही कॉलर ट्यून मागील पाच महिन्यांपासून लोकांच्या कानावर पडत असून, आता त्याची सवयच झाली आहे. पण, या कॉलर ट्यूनमुळे उद्भवणाऱ्या समस्येकडे बाळा नांदगावकर यांनी लक्ष वेधले आहे.

यासंदर्भात मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी कोरोनासंदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो अथवा लागत नसल्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच असल्यामुळे ही कॉलर ट्यून आता त्वरित बंद करावी, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.