कोरोना : मुंबईत वृद्धांसाठी बदलले होम आयसोलेशनचे नियम

मुंबईत कोरोनामुळे वृद्धांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. मुंबईतील एकूण मृत्यूपैकी 83 टक्के मृत्यू हे 50 वर्षांपुढील रुग्णांचे झाले आहेत. मृत्यू दर जास्त असल्याने ठिकठिकाणी स्क्रिनिंग कॅम्प लावून वृद्धांची आरटीपीसीआर चाचणी होत आहे. 50 वर्षांवरील रुग्णांना, ज्यांना हलकी लक्षणे देखील आहेत, अशांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये जावे लागेल.

महापालिकेचे उपायुक्त विश्वास शंकरवार म्हणाले की, मृत्यू दर कमी करण्यासाठी कोरोना चाचणी वाढवण्यात आली आहे. जेणेकरून लवकर लक्षणांची माहिती मिळेल व हॉस्पिटलमध्ये दाखल करता येईल. या स्क्रिनिंग कॅम्पमध्ये ज्यांचे वय 50 पेक्षा अधिक आहे आणि ज्यांना ब्लड प्रेशर, हायपरटेंशन असे आजार आहेत त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. 50 पेक्षा कमी वयाच्या लोकांची अँटीजेन चाचणी केली जात आहे.

नवीन नियमांनुसार 50 वर्षांवरील सर्व कोरोनाग्रस्तांना लक्षण नसले तरीही आता कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवले जाईल. या वयाच्या सर्व रुग्णांसाठी घरीच आयसोलेट करण्याचे नियम बदलले आहेत.