भारतात गुपचूप वापरले जात आहे हे चीनी अ‍ॅप, 5 कोटीवेळा झाले डाउनलोड

भारताने जुलै महिन्यात 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. यानंतर काही दिवसांनी पुन्हा 15 अ‍ॅप्सवर बंदी घालत चीनला चांगलाच दणका दिला होता. भारताने बंदी घातलेल्या अप्समध्ये प्रामुख्याने सोशल मीडिया अ‍ॅप्स, शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप्स होते. मात्र यातच भारतात एक अ‍ॅप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, या अ‍ॅपचा चीनशी संबंध आहे.

या अ‍ॅपचे नाव स्नॅक व्हिडीओ आहे. गुगल प्लेस्टोरवर या अ‍ॅपला आतापर्यंत 5 कोटींपेक्षा अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. स्नॅक व्हिडीओ देखील एक शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप असून, यात एडिटिंग, लिप सिंकिंग आणि स्पेशल इफेक्ट सारखे अनेक फीचर्स आहेत. लाँच झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यात हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर टॉप चार्टमध्ये आले आहे. 21 जुलैपर्यंत हे अ‍ॅप टॉप 10 फ्री अ‍ॅप लिस्टमध्ये होते. हे अ‍ॅप केवळ 50एमबीचे आहे.

स्नॅक व्हिडीओ एक चीनी अ‍ॅप आहे. याला Kuaishou टेक्नोलॉजीने यावर्षाच्या सुरुवातीला लाँच केले होते. ही एक चीनची मोठी कंपनी आहे. या कंपनीचे अनेक अ‍ॅप्स जगभरात वापरले जातात. यात टेंनसेंटची देखील गुंतवणूक आहे.

स्नॅक व्हिडीओ अ‍ॅप अन्य देशांमध्ये Kwai नावाने वापरले जाते. भारतात देखील या अ‍ॅपचे हेच नाव होते, मात्र सरकारने बंदी घातल्यानंतर स्नॅक व्हिडीओ नावाने बाजारात पुन्हा आले.  मात्र सरकारने या अ‍ॅपला बंदी घातलेल्या अ‍ॅपच्या यादीत ठेवलेले नाही.