लिपुलेखमध्ये क्षेपणास्त्र तैनात करणार चीन, मानसरोवराच्या किनारी करत आहे साईटचे निर्माण

मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला चीनसोबतचा तणाव अद्याप कमी झालेला नाही. आता चीन लिपुलेखमध्ये क्षेपणास्त्र तैनात करण्याच्या तयारीत आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करू शकते. चीनने लिपुलेखमध्ये मानसरोवर लेकच्या किनारी क्षेपणास्त्र तैनात करण्यासाठी साईटची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. लिपुलेखवरून सध्या भारत-नेपाळमध्ये तणाव सुरू आहे. याचाच फायदा चीन घेण्याचा प्रयत्न करत आहे. नेपाळसोबत मिळून भारताला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ट्विटरवर ओपन सोर्स इंटेलिजेंस detresfa ने एक सेटेलाईट फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत लिहिले की, चीन लिपुलेखच्या ट्राय-जंक्शन भागात क्षेपणास्त्रांच्या तैनातीसाठी बांधकाम करत आहे. येथे सैनिक देखील तैनात केले जातील. या भागातील 100 किमी क्षेत्रफळात चीनी सैन्याची सक्रियता वाढली आहे.

चीन या भागात कोणते क्षेपणास्त्र तैनात करणार आहे याची अद्याप माहिती नाही. मात्र भारताची सीमा या भागापासून जास्त लांब नाही. चीनने काही दिवसांपुर्वीच लिपुलेखच्या आजुबाजूला आपले 1000 जवान तैनात केले आहे.

लिपुलेखजवळच भारताने मानसरोवर यात्रेसाठी नवीन रस्ता बनवला आहे. नेपाळने भारताच्या या रस्त्यावर आक्षेप घेतल्याने लिपुलेख चर्चेत आले होते. यानंतर नेपाळने नवीन राजकीय नकाशा जारी करत लिपुलेख, कालापानी आपला भाग असल्याचे म्हटले होते.