सुशांतच्या आत्महत्येचा सीन रिक्रिएट करणार सीबीआय


मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले असून हे पथक मुंबईत दाखल होत अॅक्शन मोडमध्ये असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर सुशांतच्या आत्महत्येचा सीन सीबीआय रिक्रिएट करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

त्याचबरोबर सीबीआय सीलिंग फॅन आणि बेडमध्ये नेमके अंतर किती आहे? सहा फूट उंचीच्या सुशांतचे पाय फासावर लटकताना बेडवर होते, की खाली याची खातरजमा करणार आहे. आज सुशांतच्या घरी क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी सीबीआय येणार असल्याची माहिती आहे. सीबीआयसोबत फॉरेंसिकचे एक पथक देखील असणार आहे. त्याचबरोबर पोस्टमार्टेम, व्हिसेरा, घरात उपस्थित असलेले चार साक्षीदार या सगळ्यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील ऊलवे येथे असलेल्या सुशांत सिंह याच्या ऑफिसलाही सीबीआय भेट देणार आहे.

दरम्यान, सीबीआयच्या ताब्यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आहे. शौविकला सीबीआयच्या गेस्ट हाऊसवर बोलावून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर कुक नीरज यालाही सीबीआयने चौकशीसाठी बोलावले. सुशांतची डायरी, मोबाइल, लॅपटॉप मुंबई पोलिसांकडून सीबीआयला सुपूर्द करण्यात आले आहे.

सीबीआयकडे अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आल्यानंतर सीबीआयचे पथक मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहे. सीबीआय आणि मुंबई पोलीस यांच्यात समन्वय साधण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस सुवेज हक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सीबीआयने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी मनोज शशिधर हे सीबीआय पथकाचे प्रमुख असतील. महिला आरोपींची चौकशी करण्यात अडचण उद्भवू नये म्हणून गगनदीप गंभीर आणि नुपूर प्रसाद यांनाही चार सदस्यीय एसआयटीत समाविष्ट करण्यात आले आहे. तर अनिल कुमार यादव हे तपास अधिकारी असतील.