कोरोना व्यतिरिक्त भारतात वेगाने वाढत आहे हा आजार

देशात कोरोना व्हायरसमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. दररोज हजारो नवे रुग्ण सापडत आहेत. मात्र दुसरीकडे कोरोना व्यतिरिक्त कॅन्सरग्रस्तांचा आकडा देखील भारतात झपाट्याने वाढत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (आयसीएमआर) कॅन्सरबाबत एक रिपोर्ट जारी केला असून, भारतात पुढील 5 वर्षात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये 12 टक्क्यांनी वाढ होईल, असे म्हटले आहे. सध्या भारतात कॅन्सरग्रस्तांची संख्या 14 लाखांपेक्षा कमी आहे. पुढील 5 वर्षात याच वेगाने रुग्ण संख्या वाढल्यास हा आकडा 15.69 लाखांच्या पुढे जाईल.

रिपोर्टनुसार, दिल्लीत लहान मुलांना कॅन्सर झाल्याचे मोठ्या प्रमाणात समोर आले आहे. रिपोर्टनुसरा, वर्ष 2020 मध्ये तंबाखूमुळे कॅन्सर झालेल्या रुग्णांची संख्या 3.7 लाख आहे. जी एकूण कॅन्सरग्रस्तांच्या 27.1 टक्के आहे. तंबाखू हे कॅन्सरचे मोठे कारण असल्याचे समोर आले आहे. भारतात आयझोल या जिल्ह्यात सर्वाधिक कॅन्सरग्रस्त आढळून येत आहेत. संपुर्ण आशियात आयझोल जिल्ह्यातच महिलांना सर्वाधिक फुफ्फुसाचा कॅन्सर होत असल्याचे आढळले आहे. एम्सचे सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्रोफेसर डॉक्टर एसवीएस देव यांनी सांगितले होते की, 40 टक्के अशी प्रकरणे आहेत ज्यात तंबाखूमुळे कॅन्सर झाल्याचे आढळले आहे. आता 20-25 वयोगटातील मुलांना देखील हा आजार होत आहे. तंबाखूचे सेवन सुरू केल्यानंतर 10-20 वर्षांनी कॅन्सर झाल्याचे समजते.

देशात फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. कॅन्सरच्या क्षेत्रातील वरिष्ठ डॉक्टर अरविंद कुमार म्हणाले की, तंबाखूवर वेळ असतानाच निर्बंध घालणे गरजेचे आहे. असे न झाल्यास येणार्या काळात फुफ्फुसाच्या कॅन्सरग्रस्तांची संख्या वेगाने वाढेल. ‘द ग्लोबल बर्डन ऑफ डिजीज स्टडी’ (1990-2016) नुसार, भारतात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे सर्वाधिक प्रकरण आढळली आहेत. त्यानंतर सर्वाइकल कॅन्सर, पोटाचा कॅन्सर,कोलोन अँड रेक्टम आणि लिप अँड कॅव्हिटी कॅन्सरचे प्रकार अधिक आढळले आहेत. सर्वाधिक ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण हैद्राबाद, चेन्नई, बंगळुरू आणि दिल्ली या शहरांचा समावेश आहे.

कॅन्सरपासून वाचण्यासाठी काय करावे ?

विशेषज्ञांनुसार, कॅन्सरपासून वाचण्यासाठी तंबाखूचे सेवन बंद करावे. सिगरेट पिने बंद करावे. तसेच एखादी व्यक्ती सिगरेट पित असल्यास त्याच्या जवळ थांबणे धोकादायक ठरते. सोबतच जास्त वेळ एकाजागी बसणे टाळून, हालचाली वाढवाव्यात. याशिवाय मीठ, साखर आणि चरबीयुक्त पदार्थ कमी खावेत. हिरव्या पालेभाज्या आणि ताजी फळे खावीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही