धोनीनंतर आता सुरेश रैनासाठी मोदींचे भावनिक पत्र


नवी दिल्ली – माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर अवघ्या काही मिनिटांतच भारताचा तडाखेबाज डावखुरा फलंदाज सुरेश रैना याने १५ ऑगस्टला निवृत्ती जाहीर केली. सोशल मीडियावर रैनाने निवृत्ती जाहीर केल्यानंतर बीसीसीआयशी अधिकृतरित्या निवृत्ती घेण्याबद्दल संपर्क साधला. बीसीसीआयने या गोष्टीचे स्पष्टीकरण देत त्याच्या निर्णयाचा आदर केला आणि त्याच्या क्रिकेटमधील कार्यालादेखील सलाम केल्यानंतर रैनाच्या कारकिर्दीला पत्राच्या माध्यमातून थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सलाम करत त्याचे अभिनंदन केले.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून आलेल्या पत्राचे फोटो ट्विटरवर धोनीप्रमाणेच रैनानेही पोस्ट केले. रैनाने या पत्राबद्दल आभार मानताना भावनिक ट्विटदेखील केले. देशासाठी खेळताना आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावतो. देशातील नागरिकांकडून आणि चाहत्यांकडून मिळणारे प्रेम हेच आमच्यासाठी प्रेरणास्थान असते. त्यातच आमची पाठ देशाच्या पंतप्रधानांनी कौतुकाने थोपटणे हा तर आमचा सर्वोच्च सन्मान आहे. यापेक्षा आणखी वेगळे काय हवे… पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुमच्या कौतुकाच्या शब्दांनी मी भरून पावलो, जय हिंद!”, अशा शब्दात रैनाने पत्राबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

एकाच दिवशी निवृत्ती स्वीकारणाऱ्या धोनी आणि रैनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या. या दोन खेळाडूंच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल पत्रात मोदी यांनी त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.