गणपतीचे वाहन मूषक


आज गणपतीची कोणतीही मूर्ती पाहिली तरी गणपतीबाप्पांच्या पायाशी वाहन म्हणून असलेला मूषक किंवा उंदीर दिसतोच. उंदीर हेच गणपतीचे वाहन म्हणून आपण मानतो. मात्र असे असले तरी गणपतीच्या ज्या कांही प्राचीन मूर्ती आज आढळतात त्यात त्याला वाहन नाही. मुद्गल पुराणात गणेशाचे आठ अवतार वर्णिले आहेत त्यातील पाच अवतारात मात्र उंदीर हे गणपतीचे वाहन आहे तर अन्य अवतारात वक्रतुंड गणेशाचे वाहन सिंह, विकटाचे वाहन मोर तर विघ्नराज गणपतीचे वाहन शेष नाग आहे.

गणेश पुराणात गणेशाचे चार अवतार वर्णिले आहेत. त्यात धुम्रकेतूचे वाहन घोडा, गजाननाचे वाहन उंदीर, महोत्कटाचे वाहन सिंह तर मयुरेश्वराचे वाहन मोर आहे. जैन ग्रंथात उंदीर, हत्ती, कासव आणि मोर अशी गणपतीची वाहने आहेत. मात्र पश्चिम आणि मध्य भारतातील गणेश शिल्पात उंदीर हेच गणपतीचे मुख्य वाहन आहे. सातव्या शतकापासून गणपती शिल्पात उंदीर गणपतीच्या पायाशी असलेला दिसतो. लिखित स्वरूपात मस्य पुराण, नंतर ब्रह्मानंद पुराणात गणेशाच्या शेवटच्या अवतारात उंदीर वाहन आहे.

गणपती अथर्वशीर्षात गणपतीच्या ध्वजावर उंदीर असल्याचे वर्णन आहे तर गणेश सहस्त्रनामात मूषकवाहनम असा उल्लेख येतो. उंदीर हा तमोगुणाचे प्रतीक असल्याचे कांही अभ्यासकांचे म्हणणे आहे . संस्कृत मध्ये मूषक असा शब्द उंदीरासाठी वापरला जातो तो मूळ मस म्हणजे चोरी यावरून आला आहे.कृषी क्षेत्रासाठी उंदिर हा अतिशय उपद्रवी आणि नुकसानकारक प्राणी आहे. गणेशाची विघ्नहर प्रतिमा यातूनच आली असून ती या उपद्रवावर मात करणारी देवता मानली जाते. ग्रामदेवता म्हणूनही गणपती विघ्नहर स्वरूपातच दिसतो.

Leave a Comment